एकच बेटी, धनाची पेटी ! जाणून घ्या, 'माझी कन्या भाग्यश्री योजना'!

संदीप लांडगे
Friday, 9 October 2020

माझी कन्या भाग्यश्री योजनेचा औरंगाबाद जिल्ह्यात ५१ पालकांना मिळाला लाभ. 

औरंगाबाद : २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षातील माझी कन्या भाग्यश्री योजनेत लॉकडाउनपूर्वी देण्यात आलेल्या प्रस्ताव मंजुरीत ५१ जणांना लाभ मिळाला आहे. एकच अथवा दोन्ही मुलीच अपत्य असणारांना या योजनेचा लाभ घेता येतो. मात्र या योजनेबद्दल अजूनही हवी तशी जागरूकता नाही. सुरुवातीची तीन वर्षे तर योजना लाग होऊनही एकही प्रस्ताव आला नव्हता. आता परिस्थिती बदलत असल्याचे जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्यात मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, बालविवाह रोखून मुलींचे शिक्षणातील प्रमाण वाढावे. यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्यावतीने ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू करण्यात आली. २०१६-१७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या योजनेत सुरुवातीला एकही प्रस्ताव दोन वर्षे आला नव्हता. आता हळूहळू प्रस्ताव येतात; परंतु त्याचे प्रमाण हवे तसे नाही. यंदा २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षात ५१ जणांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तर नव्याने २१ प्रस्ताव सध्या आले आहेत. कोरोनामुळे कागदपत्रांची पडताळणी आणि काही तपासण्या बाकी असल्याचे विभागाने म्हटले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशी आहे योजना 

या योजनेअंतर्गत एकच मुलगी असेल तर ५० हजार रुपये आणि दोन मुली असतील तर प्रत्येकी एकीसाठी २५-२५ हजार रुपये एफडी मुलींच्या नावाने करण्यात येते. मुलींच्या वय वर्ष १८ होईपर्यंत पालक ही रक्कम काढू शकत नाहीत. केवळ शिक्षणासाठीच ही रक्कम वापरता येते. एक ऑगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या मुलींनाच याचा लाभ घेता येतो; तसेच आधारकार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, मुलगीच अपत्य असताना शस्त्रक्रिया करून घेतल्याचे सिव्हिल सर्जनचे प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न हे सात लाखांच्या आत असणे आवश्यक आहे, असे महिला व बालविकास अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: My daughter Bhagyashree Yojana Aurangabad news