Sunday Special : राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरील आठशेवर मजुरांची चोख व्यवस्था

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : देशभरात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात आहे. लॉकडाऊन आता आणखी पंधरा दिवस म्हणजे ३० एप्रिलपर्यंत वाढविण्यात आलेले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गाचे कामही बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या महामार्गाच्या कामासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या उत्तर प्रदेश, बिहार; तसेच पश्‍चिम बंगाल आदी राज्यांतील ८०० मजुरांचा प्रश्‍न निर्माण झाला होता. तथापि, एल ॲण्ड टी कन्स्ट्रक्शन कंपनीने या मजुरांच्या अन्नपाणी व निवाऱ्याची चोख व्यवस्था केली आहे. 

सहा ठिकाणी निवारे 

कामगारांची एकाच ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था केल्यास गोंधळ उडेल, यासाठी कंपनीने ८०० कामगारांची विविध सहा ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. यामध्ये गांधेली येथे १५० जणांची, देवळाई येथे १५०, ‘वाल्मी’त ५०, कांचनवाडी येथे २०० जणांची; तसेच तीसगाव येथे १५० आणि करोडी येथे १०० जणांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. या ठिकाणी जेवण, स्वतंत्र टॅंकरद्वारे शुद्ध पाणी, स्वच्छतागृहे आदींची स्वतंत्र व्यवस्था आहे. 

आपत्कालीन परिस्थितीसाठी १० क्वारंटाइन वॉर्ड केले तयार 

आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १० क्वारंटाइन वॉर्ड (खोल्या) देखील या ठिकाणी तयार करण्यात आल्या असल्याची माहिती भारत सिंग यांनी ‘सकाळ’ला दिली; तसेच कुणी आजारी असल्यास त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी आम्ही रुग्णवाहिकेचीही व्यवस्था केली आहे. महामार्गाच्या कामासाठी उत्तर प्रदेश, बिहार; तसेच बंगाल आदी राज्यांतील मजूर आणण्यात आले आहेत; तसेच ‘एल ॲण्ड टी’ कंपनीचे कर्मचारी देखील नियुक्त करण्यात आलेले आहेत. 

येथील कामगार आणि कर्मचाऱ्यांना हात धुण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्कचेही वाटप करण्यात आलेले आहे. आरोग्य तपासणीसाठी खासगी डॉक्टरांची टीम तैनात आहे. दर आठवड्याला फवारणी केली जाते. स्वच्छतागृहांची देखील नियमित साफसफाई करण्यात येते.

सोशल डिस्टन्सिंगचे पालन 

कोरोनाबद्दल मजुरांमध्ये जनजागृती केली जात आहे; तसेच येथे सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन केले जात असल्याचा दावाही भारत सिंग यांनी केला. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्राधिकृत अधिकारी अजय गाडेकर, ‘एल ॲण्ड टी’चे प्रकल्प व्यवस्थापक आर. सूर्याराव, उमाशंकर महापात्रा; तसेच कन्स्ट्रक्शन मॅनेजर भारत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गाचे काम झाल्टा फाट्यापासून ते करोडीपर्यंत जवळपास ४० टक्के झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com