CoronaVirus : लॉकडाउनमध्ये शक्कल, गल्लोगल्ली टक्कल! 

अनिलकुमार जमधडे
मंगळवार, 26 मे 2020

ना सलून दुकाने सुरू होण्याची प्रतीक्षा, ना कोरोना संसर्गाची भीती 

औरंगाबाद ः लॉकडाउनच्या अनुषंगाने गेल्या दोन महिन्यांपासून हेअर कटिंग सलून बंद असल्याने तरुणाईमध्ये थेट घरीच टक्कल करण्याची नवी क्रेझ निर्माण झाली आहे. लॉकडाऊनसोबतच उन्हाळा असा योग जुळून आल्यानेच शहरात गल्लोगल्ली तरुणाईमध्ये टक्कल करून घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. 
लॉकडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. लॉकडाउन झाल्यापासून हेअर कटिंग सलून बंद आहेत. ते केव्हा सुरू होतील याचा अद्यापही अंदाज येत नाही. सुरू झाले तरीही सलूनमध्ये गेल्यानंतर कोरोना संसर्गाचा धोका राहतोच. म्हणूनच तर तरुणाईमध्ये घरच्या घरी टक्कल करून घेण्याची नवी क्रेझ आली आहे.

हेही वाचा : असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे

‘तेरे नाम’सारखेच चित्र

लॉकडाउन सुरू झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवस भरमसाट केस वाढलेले तरुण आणि नागरिकही रस्त्यांवर दिसत होते. त्यामुळे ‘तेरे नाम’सारखेच चित्र दिसत होते. 

घरच्या घरीच टक्कल

कटिंग कुठे आणि कशी करावी असा प्रश्न जवळपास प्रत्येकालाच होता. त्यावर तरुणाईने घरच्या घरीच टक्कल करून घेण्याचा उपाय शोधून काढला आहे. अनेक जण कैचीने केस बारीक करीत आहेत, तर अनेक जण हेअर ट्रिमरच्या साह्याने वेगवेगळ्या शेपमध्ये केस कापून टक्कल करीत आहेत. डोक्यावरील त्वचेपासून केस काढून टाकणे, थोडेसे केस ठेवणे, थोडे अधिक केस ठेवणे अशा तीन चार प्रकारांत टक्कल करण्यात येत आहे. असेही उन्हाळ्यामध्ये अनेकजण बारीक कटिंग करतात किंवा टक्कल करतात. आता लॉकडाउन आणि उन्हाळा हे समीकरण जुळून आल्याने टक्कल करण्याचे प्रमाण वाढले आहे. 

हेही वाचा : हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

हेही वाचा : पद्धतशीर दृष्टीकोन ठेऊन लाॅकडाऊन उठवु शकतो - उद्योजक सुनील किर्दक 

काय म्हणतेय तरुणाई? 

लॉकडाउनमुळे कटिंग कुठे करावी असा प्रश्न होता. कोरोनाची भीतीही कायमच आहे. दुसरे म्हणजे उन्हाच्या घामापासूनही टक्कल केल्याने सुटका होते. एकूणच परिस्थितीमुळे टक्कल करून घेतले आहे. 
- सुहास चाबूकस्वार 

लॉकडाउनमुळे कटिंग करण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात पुन्हा कोरोनाची भीती आहे. त्यामुळे घरीच टक्कल करून घेतले आहे. लवकरच पुन्हा नवीन केस येतील. त्यामुळे त्याचा फार मोठा विषय नाही. 
- शुभम मटाले 

लॉकडाउनमुळे कटिंग करण्याची सोय राहिली नाही. सध्या उन्हाळा आहे. असेही प्रत्येक उन्हाळ्यात टक्कल करत असतो. टक्कल केल्याने केस गळण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे टक्कल करून घेतले आहे. 
- नितीन रणखांब 

लॉकडाउनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून कटिंग कशी करावी हा प्रश्न सतावत होता. त्यातच कोरोनाच्या संसर्गाचीही भीती कायम असल्याने कुठलाही विचार न करता टक्कल करून घेतले. 
- तेजस किर्दत 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New craze for baldness