मनसेचा नवा झेंडा फडकण्यापूर्वीच अडचणीत - व्हिडीओ

डाॅ. माधव सावरगावे
Wednesday, 22 January 2020

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून न्यायालयीन लढाई लढणारे आणि आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे.

औरंगाबाद : राज्यातील बदललेल्या नव्या राजकीय समिकरणानंतर सर्वच पक्षांतर्गत बदलास सुरुवात झालेली दिसत आहे. नव्या राजकीय समीकरणामध्ये अस्तित्त्वासाठी धडपडणाऱ्या मनसेनेही कात टाकण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे.

उद्या मुंबईमध्ये होणाऱ्या मनसेच्या अधिवेशनात पुन्हा उभारी घेण्यासाठी नेते व कार्यकर्त्यांना बळ मिळणार अशी आशा करीत आहेत. सोबतच पक्षाचा नवा झेंडा आणि पक्षाची पुढील ध्येय धोरणे आणि विचारधारा ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट केली जाण्याची शक्‍यता आहे. तत्पुर्वीच मनसेचा नवा झेंडा फडकण्यापुर्वीच वादात सापडण्याची चिन्हे आहेत. 

जाणून घ्या -निवृत्त शिक्षिकेचे मंगळसूत्र धूम स्टाईलने हिसकावले​

मनसेच्या नव्या झेंड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून न्यायालयीन लढाई लढणारे आणि आर. आर. पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी राजमुद्रेचा वापर केला तर कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. जर मनसेने राजमुद्रेचा वापर केला तर केंद्र, राज्य सरकारसोबतच निवडणूक आयोगाला पत्र देण्यात येणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

राज्यात कोणीही विचार केला नसतानाही नवीन सत्तासमीकरण उदयास आले. जे पक्ष विरोधात बसतील अशी शक्‍यता होती, त्या पक्षांनी सत्तेचे मैदान मारले. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही नव्या भूमिकेत समोर येण्यास सज्ज झाली आहे. नव्या भूमिकेसह मनसे आपला झेंडा देखील बदलत आहे. मनसेच्या नव्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे समजते. तत्पूर्वी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोग याना विनंती करणारे पत्र देण्यात येणार आहे. या पत्रात राजमुद्रेचा वापर कोणीही करू नये, कोणीही शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर टाळावा यासाठी सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. 

शिवाय राज्य आणि केंद्र सरकारने शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान कधीही होऊ नये, कोणी करू नये म्हणून राजमुद्रेचा समावेश "राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा- 1971' मध्ये समावेश करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. आज संध्याकाळपर्यंत याबाबतचे पत्र पाठवण्यात येणार आहेत. राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाजारांचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी विनोद पाटील यांनी मागणी केली आहे. आठवडाभरापूर्वी विनोद पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंतीपत्रही पाठवले होते. मात्र त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार विनोद पाटील यांनी केला आहे. 

 

"आमची सर्व पक्ष, नेत्यांना विनंती आहे की राजमुद्रेचा वापर करू नका. आपण पाहीले आहे की, राज्यात अनेकदा पक्षातील वादात ध्वज जाळणे, पायदळी तुडवणे असे प्रकार झाले आहेत. उद्या जर मनसेने झेंड्यामध्ये राजमुद्रेचा वापर केला आणि अशी काही दुर्दैवी घटना घडली तर शिवप्रेमींचा राग अनावर होईल, तरुणांची माथी भडकतील, त्यामूळे उद्याचा धोका-वाद टाळण्यासाठी राजमुद्रेचा वापर टाळावा, अशी आमची विनंती आहे. अनेकदा निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाचा ध्वज लागला की महापालिका, नगरपालिकाचे अधिकारी-कर्मचारी ते झेंडे गोळा करून डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकतात, पायदळी तुडवतात, मग तो अवमान सहन करायचा का?, हे आपण ठरवले पाहिजे' 
- विनोद पाटील, अध्यक्ष, आर. आर. पाटील फाऊंडेशन, औरंगाबाद 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New flag of Maharashtra Navnirman Sena debates