CoronaVirus : महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे अविरत योगदान

अनिल जमधडे
रविवार, 29 मार्च 2020


अवकाळी पावसातही 
महावितरणचे कर्मचारी रस्‍त्यावर 

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला. सर्व कामकाज ठप्प झाले आहे; मात्र अशा परिस्थितीतही अवकाळी पावसाचा सामना करीत महावितरणचे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन कर्तव्य बजावत आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक घरांमध्ये बसून आहेत. कामकाज ठप्प झाले आहे. अनेक आस्थापनांनी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना सुरू केली आहे. घरामध्ये कधी नव्हे सर्वजण एकत्र आहेत. त्यामुळेच विजेची मागणी वाढली आहे. असे असतानाच काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने या अवकाळी पावसात शहरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

गेल्या दोन दिवसांपासून काही वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या कोसळल्या, अनेक खांबांवरील इन्सुलेटर फुटले, ट्रान्स्फॉर्मर फेल झाले. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत आहे. अशी परिस्थिती गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू आहे. असे असतानाही भर पावसामध्ये अंधारात चाचपडत महावितरणचे कर्मचारी कामावर आहेत. सर्वांत अगोदर फॉल्ट शोधणे, फॉल्ट सापडल्यानंतर त्याची दुरुस्ती करणे असे आवाहन या कर्मचाऱ्यांपुढे असते. महावितरणचे बहुतांश अधिकारी-कर्मचारी, तंत्रज्ञ, वीजमित्र असे सर्वच कर्मचारी रस्त्यावर फिरून वीज सुरळीत ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

समजून घेण्याची गरज 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, आरोग्य सेवेतील वाहनचालक, पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी ज्याप्रमाणे २४ तास सेवेत आहेत त्याचप्रमाणे महावितरणचे कर्मचारीही चोवीस तास सेवा देत आहेत. तासभर विद्युत पुरवठा खंडित झाला तरीही नागरिक हतबल होतात आणि महावितरणच्या नियंत्रण कक्षांचे फोन खणखणू लागतात. काय झाले हे समजून घेण्यापेक्षा लाइट केव्हा येईल, असा थेट प्रश्न नागरिकांचा असतो.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तातडीने वीजपुरवठा सुरू हवा ही सामान्य नागरिकांची भावना असते. त्यासाठीच महावितरणचे कर्मचारी अहोरात्र काम करीत आहेत. त्यामुळेच नागरिकांनीही आपत्कालीन परिस्थितीत महावितरणला आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांना समजून घेण्याचीही गरज आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About Mahavitran Aurangabad