esakal | CoronaVirus : एकोणतीस हजार कुटुंबांची रात्र अंधारात 
sakal

बोलून बातमी शोधा

photo

वादळी पावसाने शहरात महावितरणची दाणादाण  

महावितरणचे वीजपुरवठ्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न 
०तब्बल पन्नास उपकेंद्र कोलमडले 
०शहरात २२ वीजवाहिन्या प्रभावित 
०ठिकठिकाणी तुटल्या वीजवाहिन्या 

CoronaVirus : एकोणतीस हजार कुटुंबांची रात्र अंधारात 

sakal_logo
By
अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : निसर्ग चक्रीवादळामुळे बुधवारी (ता. तीन) औरंगाबाद परिमंडलात ५४ उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनी अविरत परिश्रम घेऊन युद्धपातळीवर केलेल्या दुरुस्तीमुळे गुरुवारी (ता. चार) दुपारपर्यंत ५० उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरू झाला होता. उर्वरित उपकेंद्रांचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे जवळपास २९ हजार ग्राहकांना रात्र अंधारात काढावी लागली. 

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम शहरावर जाणवला. बुधवारी सायंकाळी सोसाट्याचा वारा व पावसामुळे झाडे कोसळून अनेक ठिकाणी विद्युततारा तुटल्या; तसेच खांब पडले. त्यामुळे औरंगाबाद शहर मंडलातील तीन, ग्रामीण मंडलातील ४१ व जालना मंडलातील १० विद्युत उपकेंद्र बंद पडली. वाऱ्याची तीव्रता जास्त असल्याने जीवितहानी टाळण्यासाठी अनेक वाहिन्यांचा वीजपुरवठा खबरदारी म्हणून तात्पुरता बंद ठेवण्यात आला होता. वादळाचा जोर ओसरल्यावर महावितरणची यंत्रणा लगेच कामाला लागली. मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व अभियंत्यांना वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे निर्देश देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

औरंगाबाद शहरात २२ वाहिन्यांवरील जवळपास २९ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. हिमायतबाग, हर्सूल, गोलवाडी, नाथ व्हॅली, सातारा परिसर, पन्नालालनगर, समर्थनगर, सेंट्रल बसस्टँड परिसर, पोलिस आयुक्त कार्यालय, औरंगपुरा, चिकलठाणा, सिडको, हडको, रेल्वेस्टेशन, पदमपुरा, छावणी, पडेगाव आदी परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महावितरणच्या अभियंते, तांत्रिक कर्मचारी, बाह्यस्रोत कर्मचारी तसेच विद्युत कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांनी बिघाड शोधून रात्रभर केलेल्या दुरुस्ती कामामुळे गुरुवारी दुपारपर्यंत बहुतांश शहराचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणच्या कर्मचाऱ्यांना यश आले. अनेक ठिकाणी विद्युतवाहिन्यांवर पडलेली झाडे हटवण्यासाठी महानगरपालिका, अग्निशमन दल तसेच नागरिकांनीही मदत केली. ग्रामीण भागात औरंगाबाद, वैजापूर, कन्नड, पैठण तालुक्यांतील वीजपुरवठा वादळी वारे व पावसामुळे खंडित झाला होता. जालना जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे दोन्ही जिल्ह्यांत काही भागांचा अपवाद वगळता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मुख्य अभियंत्यांची पाहणी 

वादळामुळे झालेल्या नुकसानीची मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी गुरुवारी सकाळी पाहणी केली. वैजापूर तालुक्यातील महालगाव व शिरूर येथे भेटी देऊन त्यांनी वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करण्याच्या सूचना उपकार्यकारी अभियंत्यांना दिल्या.