SUNDAY_POSITIVE : रोटी बॅंक भागवतेय आठशे बेघरांची भूक

file photo
file photo

औरंगाबाद : महासत्तेच्या मार्गावर असलेल्या भारतात अजूनही लाखो लोक उपाशीपोटी झोपतात. दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर अन्न वाया घालविण्याचे प्रकारही घडत आहेत. अशातच या वाया जाणाऱ्या अन्नातून उपाशीपोटी झोपणाऱ्यांची भूक भागविण्याचे काम औरंगाबादेत डिसेंबर 2015 पासून एक बॅंक सातत्याने करीत आहे. ही बॅंक काही पैशांची देवाण-घेवाण करणारी बॅंक नाही, तर ती "रोटी बॅंक' आहे. युसूफ मुकाती त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या रोटी बॅंकेच्या माध्यमातून शहरातील जवळपास आठशेहून अधिक बेघरांची भूक भागवीत आहेत.

 आगळावेगळ्या उपक्रमास शहरवासी आणि हॉटेल व्यावसायिकही सढळ हाताने वाचलेले अन्न या बॅंकेत आणून देत आहेत. शहरात असे अनेक गरीब, निराधार लोक आहेत, ज्यांना अन्न न मिळाल्याने उपाशीपोटी झोपावे लागते. एकवेळचे जेवणही त्यांना मिळणे कठीण झाले आहे. अशा लोकांसाठी ही रोटी बॅंक जीवनदायी ठरली आहे. सामाजिक कार्याची आवड असलेल्या युसूफ मुकाती यांनी त्यांचे मित्र हरविंदरसिंग सलुजा, सतीश वायकोस, खालेद बेग, साजीद ताबानी, फेरोज खान यांच्या माध्यमातून रोटी बॅंक बेघर, निराधारांना आधार देण्यासाठी सुरू झाली. छोट्या स्तरावर सुरू झालेला हा उपक्रम आज सर्वत्र पोचला आहे.

बेघरांना सकाळी 11 ते रात्री आठ वाजेपर्यंत दोन्ही वेळत जेवण  

यातून मंदिर, मस्जीद, दर्गा, रुग्णालयाजवळ राहणारे बेघर हक्‍काने येथे रोटी बॅंकेतून जेवण घेऊन जातात. 100 ते 200 लोकांपासून सुरवातीला हा उपक्रम होता. आता तो 800 लोकांपर्यंत पोचला आहे. बेघरांना सकाळी 11 ते रात्री आठ वाजेपर्यंत दोन्ही वेळचे जेवण मिळते तेही विनामूल्य. याबद्दल युसूफ मुकाती म्हणाले, की 365 दिवसांपैकी दीडशे असे दिवस असतात, त्यावेळी सर्वाधिक अन्न आमच्याकडे येते. हे अन्न आम्ही वृद्धाश्रम, अनाथालय, घाटी रुग्णालय, बसस्थानक, रेल्वेस्थानक येथे जाऊन वाटप करतो. हॉटेलचालक, लग्नसमारंभ यांच्यातर्फे अन्न वाचल्यानंतर आवर्जून ते अन्न आमच्याकडे आणून देतात. पुढील काही काळात आम्ही रोटी बॅंक सेवा ट्रस्ट एनजीओ स्थापन करीत आहोत. यातून आमच्याकडे येणारे अन्न पॅकिंगच्या माध्यमातून गरजूंना देणार आहोत. 

अशी झाली सुरवात 
युसूफ मुकाती म्हणाले, की गरिबीत राहिल्याने त्यांच्या अडचणी कळल्या. यामुळे मित्रांनी मिळून निश्‍चय केला. कोणीही उपाशीपोटी झोपू नये म्हणून जिन्सी-बायजीपुरा रोडवर 2015 मध्ये रोटी बॅंक सुरू केली. यात दोन फ्रीज घेतले. यासाठी सर्व मित्रांनी मिळून घरा-घरात जाऊन दोन भाकरी जास्त बनवा, भाजी जास्त बनवून आमच्याकडे द्या, असे आवाहन केले. त्या आवाहनास प्रतिसाद मिळाला. या दोन्ही फ्रीजमध्ये बेघरांसाठी जेवण येऊ लागले. यासह आम्ही लग्नसमारंभात बॅंनर लावून जनजागृती केली. यामुळे लग्नात उरलेले अन्न हे आमच्याकडे येऊ लागले. सुरवातीला 250 लोकांचे जेवण आमच्याकडे येत होते. यात दोन पोळ्या व भाजी आम्ही प्रत्येकाला देत होतो. आता 800 गरजू, गरीब, हातावर पोट असणारे मजूर, हमाल ते अन्न घेऊन आपली भूक भागवत आहेत. रोटी बॅंकेसाठी नियमितपणे हॉटेलचालकांतर्फेही अन्न देण्यात येत आहे. 

हेही वाचा -पथक आले पण कोणी नाही पाहिले

कपडा बॅंक 
"रोटी बॅंके'च्या माध्यमातून मानवतेचे मोठे कार्य शहरात सुरू आहे. एवढेच नव्हे, यापुढे जाऊन गरजूंसाठी मुकाती यांनी कपडा बॅंक सुरू केली. यातून रोज 300 ते 400 गरजू कपडे घेऊन जात आहेत. याचा स्लम भागातील लोकांना सर्वाधिक लाभ झाला. यासह वॉटर बॅंक गेल्या पाच वर्षांपासून मोफत पाणी वाटप केले जात आहे. वॉटर प्युरिफायरचे पाणी वाटप करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com