पुण्यासाठी लालपरी बंद

अनिल जमधडे
बुधवार, 15 जानेवारी 2020

औरंगाबादहून पुण्याला जाण्यासाठी पूर्वीच्या लालपरीचे भाडे आवाक्‍यात होते. त्यामुळेच ग्रामीण भागातील आणि सामान्य प्रवाशांना अवघ्या साडेतीनशे रुपयांमध्ये पुण्याला जाता येत होते. मात्र लाल बस बंद केल्याने शिवशाहीने जवळपास शंभर रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

औरंगाबाद : पुणे येथे जाण्यासाठी प्रत्येक अर्ध्या तासाला बस आहे. मात्र औरंगाबाद आगाराने लालपरी बंद केल्या. लालपरी ऐवजी शिवशाही चालवण्यात येत असल्याने सामान्य प्रवाशांची आर्थिक कुचंबना होत आहे. शिवशाहीचे अधिकचे भाडे देवून प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. 

पुण्याला जाण्यासाठी शहरातून प्रत्येक अर्ध्या तासाला एसटीची बससेवा आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर लालपरी आणि एशियाड बस पुणे मार्गावर धावायच्या. लालपरीचे भाडे आवाक्‍यात होते, त्याखालोखाल एशियाड बसचे भाडे होते. मात्र, औरंगाबद आगाराने शिवशाहीचे आगमन झाल्यानंतर लालपरी बंद करुन टाकली आहे. त्याचप्रमाणे एशियाड बसही कमी केल्या आहेत. औरंगाबाद आगाराने लालपरीऐवजी शिवशाहीला बळ दिले आहे. त्यामुळे शिवशाहीच्या जाणे आणि येणे अशा तब्बल 36 फेऱ्या सुरु आहेत. त्याचप्रमाणे शिवनेरी व्हॉल्वो बसच्या जाण्या-येण्याच्या 18 फेऱ्या सुरु आहेत. शिवशाही आणि शिवनेरीला बळ दिल्याने लाल बस बंद करण्यात आली. तर एशियाडच्या केवळ तीन बसच्या सहा फेऱ्या केल्या जात आहेत. 

 

आर्थिक भुर्दंड 

पुण्याला जाण्यासाठी पूर्वीच्या लालपरीचे भाडे आवाक्‍यात होते. त्यामुळेच ग्रामीण भागातील आणि सामान्य प्रवाशांना अवघ्या साडेतीनशे रुपयांमध्ये पुण्याला जाता येत होते. मात्र लाल बस बंद केल्याने शिवशाहीने जवळपास शंभर रुपये अधिक मोजावे लागत आहेत. लालपरी बंद झाल्याने प्रवाशांच्या खिशाला आर्थिक फटका सहन केल्याशिवाय पर्याय उरला नाही. 

हेही वाचा : तुझ्या रक्तामध्ये भीमराव पाहिजे 

लालपरीवर मर्यादा 

औरंगाबाद आगाराने पुण्याला जाणाऱ्या लालपरी बंद केल्या आहेत. असे असले तरीही जालना, बीड, नांदेड अशा बाहेरच्या काही आगारांच्या लालपरी औरंगाबादमार्गे धावत आहेत. मात्र या बाहेरगावाहून येणाऱ्या बस असल्याने ही सेवा अत्यंत तुरळक झाली आहे. विशेष म्हणजे आलेल्या बसमध्ये जागा मिळेल याची काहीही शाश्‍वती नसते. या बस बाहेरुन येत असल्याने चौकशी खिडकीवरील कर्मचारीही बस केंव्हा येईल हे सांगता येत नाही, असे उत्तर देतात. 

हेही वाचा : विद्यापीठ गेटवर साहित्य जत्रा 

प्रवाशी म्हणतात... 

आर्थिक भुर्दंड वाढला 
मयूर म्हस्के : पुण्याला जाण्यासाठी लाल बसची प्रतिक्षा करुनही बस मिळत नाही. बसस्थानकात बराच वेळ प्रतिक्षा केल्यानंतर शिवशाहीशिवाय पर्याय उरत नाही. त्यामुळे नाईलाजाने शिवशाहीने प्रवास करावा लागतो. 

लाल बस सुरु करा 
प्रकाश त्रिभुवन : पुण्याला जाण्यासाठी मोठा प्रवाशी वर्ग आहे. ग्रामिण भागातील प्रवाशी कामानिमित्त पुण्याला जात असतो. मात्र त्यांना लाल बस मिळत नाही. त्यामुळे लाल बसची संख्या वाढवली पाहिजे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About St Bus Aurangabad