भयंकर! गर्भवतीवरच घेतली शंका, आणि मग...

अनिल जमधडे
रविवार, 26 जानेवारी 2020

एसटी महामंडळातील वाहक महिलेच्या गर्भधारणेवरच शंका घेऊन आकसबुद्धीने महिलेला प्रसूती रजा नाकारून थेट बडतर्फ करण्यात आले. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत कारवाईचे आदेश एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. 

औरंगाबाद : एसटी महामंडळातील वाहक महिलेच्या गर्भधारणेवरच शंका घेऊन आकसबुद्धीने महिलेला प्रसूती रजा नाकारून थेट बडतर्फ करण्यात आले. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेत कारवाईचे आदेश एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहेत. 

दबावाचे प्रयत्न 

एसटीच्या पैठण आगारात वाहक असलेल्या सुमित्रा गर्कळ यांनी प्रसूती रजेचा अर्ज दिल्यानंतरही आगारप्रमुख तरवडे यांनी रजेचा अर्ज मंजूर करण्याऐवजी अनुपस्थित दाखवून थेट बडतर्फ केले. या विरोधात महिला आरोगाकडे तक्रार दिल्यानंतर मात्र श्रीमती गर्कळ यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

वस्तुत: कुठल्याही कार्यालयात महिलांसाठी निर्भय वातावरण तयार करून महिलांच्या तक्रारी किंवा अडचणीची दखल घ्यावी, असे शासनाचे धोरण आहे. यासाठी अनेक अध्यादेश शासनपातळीवरून निघालेले आहेत. असे असतानाही श्रीमती गर्कळ यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यात आला.

श्रीमती गर्कळ यांनी वरिष्ठांची भेट घेतल्यानंतरही न्याय मिळाला नाही, म्हणून त्यांनी पैठण आगारातील आगारप्रमुख तरवडे, सहायक वाहतूक अधिकारी गजानन मडके, वाहतूक निरीक्षक संतोष नजन, वाहतूक नियंत्रक श्रीमती निसर्गन, शंकर परागे यांच्याविरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली. 

हेही वाचा - एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

महिला आयोगाची दखल 

महिला आयोगाने उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि एसटी महामंडळात महिलांसाठी सुरक्षित वातावरण तयार करावे, अशा आदेशवजा सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विभाग नियंत्रकांनीही पैठण आगाराकडून या सर्व प्रकरणाची कागदपत्रे मागवून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचप्रमाणे श्रीमती गर्कळ यांना प्रकरण जाणून घेण्यासाठी मुंबईला बोलावण्यात आले आहे. 

हेही वाचा - याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

अनेकांवर कारवाई 

कुठल्याही शासकीय कार्यालयात महिलांना निर्भय वातारवरण निर्माण करुन देणे ही त्या विभागप्रमुखाची जबाबदारी आहे. शासनाच्या अनेक अध्यादेशानुसार वेळोवेळी जाहिर करण्यात आलेले आहे. असे असातानाही महिलांना त्रास देण्याचा प्रकार थांबत नाही. पैठण आगारातील महिला वाहकाच्या प्रेग्नसीचा विचार करुन तीला तात्काळ रजा देणे मानवता दृष्टीकोनाचा एक भाग होता. मात्र तरीही आगार व्यवस्थापकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. रजा अर्जाचा विचार न करता महिला वाहकाला मनस्ताप कसा होईल अशा दृष्टीने काम केले. विशेष म्हणजे यापुर्वीही आकस बुद्धीने काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: News About St Mahamandal Aurangabad