शोधूनही मिळेनात कोरोनाचे रुग्ण, आठवडी बाजारात एक तर जीमध्ये एकही पॉझिटिव्ह नाही

माधव इतबारे
Wednesday, 4 November 2020

काही महिन्यांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाची दमछाक होत होती. महिनाभरापासून चित्र पूर्णपणे बदलले आहे.

औरंगाबाद :  काही महिन्यांपूर्वी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाची दमछाक होत होती. महिनाभरापासून चित्र पूर्णपणे बदलले आहे. सध्या शोधूनही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत नाहीत. महापालिकेने शहरातील आठवडी बाजार व जीममध्ये जाऊन कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात आठवडी बाजारात एक जण पॉझिटिव्ह आढळून आला तर सहा जीममध्ये एकही जण पॉझिटिव्ह आढळून आला नाही. हे चित्र दिलासादायक असले तरी कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने प्रशासन सतर्क असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

मशाल मोर्चा भाजप पुरस्कृत, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांचा आरोप

मिशन बिगेन अगेन अंतर्गत शहरातील संपूर्ण व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. चार आठवडी बाजार सुरू करण्यात आले आहेत. मात्र आठवडी बाजारात होणारी गर्दी पाहता याठिकाणाहून संसर्ग वाढू नये म्हणून महापालिकेने प्रत्येक आठवडी बाजारात पथक पाठवून नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या आठवड्यात शहानुरमियॉं दर्गा परिसरातील पिरबाजार येथील आठवडी बाजारात २० जणांची चाचणी करण्यात आली.

यातील एक जण पॉझिटिव्ह आढळून आला. छावणी बाजारात २१० जणांची, चिकलठाणा बाजारात १३२ जणांची व जाफरगेट येथील रविवार बाजारात ७२ जणांची चाचणी करण्यात आली पण एकाही जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. त्यामुळे दिलासादायक वातावरण असले तरी दिवाळीत बाजारात होणारी गर्दी, गावाला जाऊन परत येणाऱ्या नागरिकांचे प्रमाण पाहता, प्रशासन सतर्क असल्याचे श्रीमती पाडळकर यांनी सांगितले.

हवेत गोळीबार करुन बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण, औरंगाबादेतील थरारक घटना.

सहा जिममधील सर्वच फिट
आठवडी बाजारासह जीमममध्ये तपासणीसाठी पथके पाठविले जात आहेत. आत्तापर्यंत सहा जिममध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. रोषणगेट भागातील दोन जीममध्ये अनुक्रमे १२, १४ तसेच सिल्कमिल कॉलनीत- १४, गारखेडा परिसरात-१८, सूतगिरणी भागात- १०, क्रांती चौकात २२ अशा ९० जणांची चाचणी करण्यात आली. त्यांपैकी एकही पॉझिटिव्ह निघाला नाही, असे डॉ. निता पाडळकर यांनी सांगितले.

 

संपादन - गणेश पिटेकर

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No Corona Patients Found By Aurangabad Municipal Corporation