औषध नाही, लसही नाही... मग कोरोनाचे रुग्ण कसे होतात बरे? 

File Photo
File Photo

औरंगाबाद ः कोरोनाच्या संकटात अख्खे जग सापडले आहे. डोळ्यांनाही न दिसणारा हा विषाणू; परंतु त्याने सर्वच जणांना हैराण करून टाकले आहे. जगातील नामवंत संस्था, संशोधक कोरोनावर लस तयार करण्यासाठी अहोरात्र धडपड करीत आहेत. अद्याप कोरोनावर रामबाण औषध सापडले नाही. मग रुग्ण कोणत्या उपचाराने बरे होत आहेत, हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडलेला आहे. तर याचे सध्यातरी उत्तर आहे ‘सपोर्टिव्ह ट्रीटमेंट’! 

कोविड-१९ विषाणू नाक अथवा तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. त्यावेळी आपण बाधित झालो असे समजतो. आपल्या शरीरातील सैनिकी पेशींवर तो हल्ला करतो. मग तो हल्ला परतवून लावण्‍यासाठी सैनिकी पेशी विषाणूंशी लढतात.

जर आपण सुदृढ अर्थात निरोगी असू, रोगप्रतिकारकशक्ती अत्यंत चांगली असेल तेव्हा आपल्याला लक्षणे जाणवत नाहीत. त्यावेळी विषाणूची बाधा झालेल्या अशा रुग्णाला असिम्थेमॅटिक (लक्षणे जाणवत नसलेले) म्हणतात. परंतु, कोविड विषाणूपुढे सैनिकी पेशी जेव्हा कमजोर पडतात; त्यावेळी आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची लक्षणे ठळक दिसून येतात. मग आपण रुग्णालयात जातो. लाळेची चाचणी (स्वॅब टेस्ट) केली जाते.

बाधा झालेली असेल तर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येतो. मग डॉक्टर आपल्यावर उपचार करतात, आपण बरे होतो. या प्रक्रियेतून आपल्याला जावे लागते; पण मग रुग्ण कसे बरे होतात? त्यांच्यावर काय उपचार केले जातात व कोणती औषधी दिली जाते, याबाबत जिल्हा रुग्णालयाचे डॉ. अश्‍विन पाटील यांनी माहिती दिली. 

शरीरात कोविड विषाणूचा प्रवेश झाला, की ॲन्टीबॉडीज तयार व्हायला लागतात. अन्टीबॉडीज तयार झाल्या, की विषाणू निष्प्रभ होतो. त्या ॲन्टीबॉडीज कायम राहतात. पुन्हा जरी संसर्ग झाला तरी शरीरातील विषाणू मृत होतो. अशा रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्हही येऊ शकते; पण इन्फेक्टिव्हिटी (संसर्ग) नसतो. कोरोनावर अद्याप कोणतेही औषध निघालेले नाही; परंतु आपण रुग्णांवर करतो ती सर्पोटिव्ह ट्रीटमेंट आहे. 

डॉ. पाटील यांनी सांगितल्यानुसार... 

  1. ज्यांना लक्षणे नाहीत त्यांना पाच दिवसांसाठी हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही औषधी देतो. व्हिटॅमिन सप्लिमेंट देतो. त्यात झिंक, व्हिटॅमिन सी, मल्टिव्हिटॅमिन दिले जाते. 
  2. लक्षणे असलेले व त्रास जाणवत असलेल्या रुग्णांना अजिथ्रोमायसीन, ॲन्टीबायोटिक देतो. छातीत इन्फेक्शन असेल तर त्या पद्धतीचे अन्टीबायोटिक दिले जाते. 
  3. को-मॉरबीड अर्थात विविध व्याधी असलेल्या रुग्णांना अँटीव्हायरल ट्रीटमेंट, स्टेराईड दिले जाते. परिणाम गृहीत धरून ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट दिली जाते जेणेकरून व्हायरसचा रुग्णावर इफेक्ट होणार नाही. 
  4. या रुग्णांना कोरोना घातक 

डॉ. अश्‍विन पाटील म्हणाले, की एखादी व्यक्ती बाधित रुग्णांच्या संपर्कात आली, की संसर्ग होतो; परंतु कोरोनावर जरी औषधी नसली तरी सपोर्टिंग औषधींतून रुग्ण बरा होतो. ज्यांना आधीपासूनच इतर व्याधी आहेत, अशा रुग्णांनी व्यवस्थित काळजी घेतली तर तेही चांगल्याप्रकारे बरे होतात. हा विषाणू थेट श्‍वसनयंत्रणा व फुप्फुसावर हल्ला करतो. त्यामुळे जास्त घातक आहे. त्यामुळेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण आपण तपासत असतो.

फुप्फुसात संसर्ग म्हणचे न्युमोनिया झालेले बहुतांश रुग्ण बरे होतातच; परंतु काही रुग्णांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते. उपचारांना प्रतिसादच देत नसलेल्या रुग्णांसाठी मात्र कोरोना धोकादायकच आहे. त्यासाठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली ठेवण्यासाठी सर्वांनी सतत जागरूक असायला हवे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com