esakal | वाटाघाटीत अडकला ऑक्सिजन प्लांट, आता फाईलला मंजुरी प्रभारींच्या प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen plantOxygen plant

खास कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या फाईलला अडथळे सुरूच आहेत.

वाटाघाटीत अडकला ऑक्सिजन प्लांट, आता फाईलला मंजुरी प्रभारींच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : खास कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या चिकलठाणा एमआयडीसीतील मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या फाईलला अडथळे सुरूच आहेत. निविदेतील दर कमी करण्यासाठी कंत्राटदारासोबत वाटाघाटी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, ही फाईल प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा संसर्ग सुरू होताच राज्य शासनाने चिकलठाणा एमआयडीसी मधील मेल्ट्रॉन कंपनीच्या इमारतीत कोविड केअर हॉस्पिटल सुरु करून ते चालविण्यासाठी महापालिकेला दिले आहे.

या ठिकाणी दाखल होणाऱ्या करोनाबाधित व्यक्तींना ऑक्सिजनची गरज भासते. त्यामुळे मेल्ट्रॉनच्या कोविड केअर हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र ऑक्सिजन प्लांट तयार करण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी महापालिकेला केली होती. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव तयार केला व यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वाचार कोटींची तरतूद केली. यासंदर्भात महापालिकेला पत्र पाठविण्यात आले. महापालिकेने ऑक्सिजन प्लांटसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली होती.

निधी प्राप्त झाल्यावर कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश देण्याचे काम शिल्लक होते. मात्र या फाईलकडे कोणाचेही लक्ष नसल्याने ती धूळखात पडून होती. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यावर फाईल जागची हालली. या फाईलवर कंत्राटदारासोबत वाटाघाटी करण्याचा शेरा लिहिण्यात आला आहे. दरम्यान महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय सुटीवर गेल्याने त्यांचा पदभार असलेले जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे ही फाईल पाठविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. मात्र अद्याप यासंदर्भात वाटाघाटी न झाल्याने ऑक्सिजन प्लांटचे काम लांबणीवर पडत आहे.

Edited - Ganesh Pitekar