ऑनलाइन तिकीट अवैध कन्फर्म प्रकरणी एकाला अटक 

योगेश पायघन
Saturday, 25 January 2020

गुवाहाटी पोलिसांनी रेल्वे तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्या म्होरक्‍याला तेथे पकडले होते. त्याच्या चौकशीतून अनेकांची नावे समोर आली आहे. त्यापैकी सोहेल अहेमद हा एक आहे. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे, अशी माहिती आरपीएफचे अधिकारी अरविंद शर्मा यांनी दिली. 

औरंगाबाद : सॉफ्टवेअरच्या मदतीने आयआरसीटीसी या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट कन्फर्म करणाऱ्या टोळीविरोधात देशभर कारवाई करण्यात येत आहे. शहरात आरपीएफच्या जवानांनी सोहेल अहमद समीऊल्ला (25, मूळ रा. गौंडा, उत्तरप्रदेश, ह. मु. बुढीलेन) याला रेल्वेच्या अवैध तत्काळ तिकीट विक्रीप्रकरणी अटक केली आहे. त्याच्या खोलीतून पोलिसांनी मोबाईलचे 30 सीमकार्ड जप्त केले आहेत. तर 70 युजर आयडी वापरत असल्याचे समोर आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

याप्रकरणी आसामच्या भुवनेश्वरमधून म्होरक्‍या गुलाम मुस्तफा (28) याला अटक करण्यात आली आहे. दहा दिवसांपासून आयबी, स्पेशल ब्युरो, ईडी, एनआयए, कर्नाटक पोलिसांनी मुस्तफाची चौकशी केली होती. मुस्तफाकडे यावेळी तीन हजार 563 वैयक्तिक आयआरसीटीसी युजर आयडी असल्याचे उघड झाले. त्याचे विविध सरकारी बॅंकांमध्ये खाते असल्याचा संशय आहे. मुस्तफा हा डार्कनेटमध्ये प्रवेश करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरत होता. तर लॅपटॉपवर आधारित हॅकिंग सिस्टम त्याच्या लॅपटॉपवर सापडले असून, मुस्तफाच्या मोबाईलमधून पाकिस्तानी, बांग्लादेशी, इंडोनेशियन, नेपाळमधील अनेकांचे क्रमांक आढळले. शिवाय त्याच्याकडे बनावट आधार कार्ड तयार करण्याचा अर्जही आढळला आहे. 

वाचा ः वीर्यदानानेही गर्भधारणा होत नाही... हा आहे पर्याय

सहा वर्षांपासून शहरात वास्तव्य 

सोहेल अहेमद सहा वर्षांपासून शहरातील बुढीलेन वास्तव्याला आहे. तो टेलरिंगचे काम करत मोबाईलवरून रेल्वेच्या तत्काळ तिकिटांचा धंदा करत होता. गुवाहाटी पोलिसांनी रेल्वे तिकिटांची अवैध विक्री करणाऱ्या म्होरक्‍याला तेथे पकडले होते. त्याच्या चौकशीतून अनेकांची नावे समोर आली आहे. त्यापैकी सोहेल अहेमद हा एक आहे. त्याचे शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे, अशी माहिती आरपीएफचे अधिकारी अरविंद शर्मा यांनी दिली. 

अर्धा तासासाठी मिळत होती लिंक

दुबईत हामेद अश्रफ यांनी रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी व्हीपीएन आधारित सॉफ्टवेअर तयार केले. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिकीट बुकिंग करणाऱ्या व्यक्तीला अर्धा तासासाठी एक सॉफ्टवेअरची लिंक शेअर केली जात होती. यामध्ये सकाळी 11 च्या पूर्वी माहिती जमा करून ठेवण्यात येत होती. 11 वाजता एका क्‍लिकवर तिकीट बुकिंग होऊन कन्फर्म तिकीट मिळत होते. सोहेल अहेमद याला एका तिकिटामागे शंभर ते दोनशे रुपये मिळत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Arrested In Aurangabad For Ticket Invalid Confirmation