ट्रॅक्टर व कारच्या अपघातात एक जण गंभीर जखमी

हबीबखान पठाण
Saturday, 19 December 2020

ट्रॅक्टर अचानक वळण घेत असताना, बीडकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या उपरोक्त कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. यात कारचा पूर्णतः चुराडा झाला. या कारमधील डॉ.मेहमुद मुलानी हे गंभीर जखमी झाले. अपघातांनतर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून काही वेळ वाहतूक खोळंबली. 

पाचोड (औरंगाबाद) : नातेवाईकांना भेटून आपल्या कारने घराकडे परत येत असताना अपघात होऊन औरंगाबाद येथील एक डॉक्टर गंभीररित्या जखमी झाले आहे. ही घटना धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता.पैठण) शिवारात सुंदरम् जिनिंग प्रेसिंगसमोर शुक्रवारी (ता.१८) रात्री आठ वाजता घडली. 

हे ही वाचा : उमरगा : मुंबईहून परतलेले वाहक आणि चालक पॉझिटिव्ह ; बसच्या प्रवासाची सुरक्षितता धोक्यात

अधिक माहिती अशी, औरंगाबाद येथील एक खासगी रुग्णालयातील डॅा.महेमुद मुलानी (वय ३८ वर्षे) हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कार (क्र.एम.एच २० सी.एच.४८२५) ने बीड येथे गेले होते. ते नातेवाईकांस भेटून उपरोक्त कारने औरंगाबादला येत होते. ते पाचोड जवळ आले असता जिनिंगवरून कापूस टाकून रिकामे ट्रॅक्टर घेऊन चालक घराकडे जाण्यासाठी निघाला. ट्रॅक्टर अचानक वळण घेत असताना, बीडकडून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या उपरोक्त कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. यात कारचा पूर्णतः चुराडा झाला. या कारमधील डॉ.मेहमुद मुलानी हे गंभीर जखमी झाले. अपघातांनतर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागून काही वेळ वाहतूक खोळंबली. 

हे ही वाचा : परतूर येथे स्कारपीओ चालकावर केला चाकूने जीवघेणा हल्ला ; दोन अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल 

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून मदत कार्य केले. तर पाचोड येथील टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेला बोलवण्यात येवून जखमींना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करुन त्यांच्यावर प्रथमोपचार करून त्यांना औरंगाबादला पाठविले. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोडचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे व त्यांचे सहकारी करत आहेत.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One person has been seriously injured in a tractor and car accident at Pachod