अख्ख्या गावात राहील्या पाचच ज्येष्ठ महिला!  

यादव शिंदे 
Sunday, 8 November 2020

  • सोयगाव तालुक्यातील रामपूरवाडी येथील स्थिती
  • रामपूरवाडीत ना दिवाळी ना आनंदोत्सव !
  • गावातील सर्वच लोक गेले ऊसतोडणीला. 

जरंडी  (औरंगाबाद) : कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर दिवाळी सणाचे वेध लागले असताना दुसरीकडे मात्र आदिवासी रामपूरवाडीतील अख्खे गावच ऊसतोडीवर गेल्याने या गावात केवळ पाच वृद्ध महिला राहत आहेत. ग्रामस्थांनी ऊसतोडीवर जाण्याचा निर्णय घेतला अन् घरांना कडीकोयंडा व बांबूचा आधार देत घर उघड्यावर सोडून ऊसतोडीसाठी अख्खे गावच गेल्याने या गावाची सुरक्षा केवळ पाच वृद्ध महिलांवर आहे. या आदिवासी गावात दिवाळी सण साजरा होणार नाही. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

सोयगाव तालुक्यात रामपूरवाडी हे ४३६ लोकसंख्येचे आहे. या गावाला कोरोनापासूनच दृष्ट लागली होती. कोरोना काळात चक्क या गावातील ग्रामस्थांना पाण्यावर जीवन जगावे लागले होते. आता मात्र मायापुंजीच नसल्याने अख्खे गाव ऊसतोडीवर गेल्याने गावात पाच वृद्ध महिला वास्तव्यास आहेत. काही कुटुंबीय तर बांबूच्या काठीवर घरांची सुरक्षा करून ऊसतोडीवर गेले आहेत. गावात कोणताही शासकीय अधिकारी व कर्मचारी फिरकला नाही. आर्थिक चणचणीत आलेल्या आदिवासी मजुरांना घर सोडावे लागले. या परिसरात शासनाने रोजगार हमी योजनेचे कामे हाती घेतली असती तर या आदिवासी तांड्याचे स्थलांतर थांबले असते, अशी प्रतिक्रिया आदिवासी मजुरांनी दिली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एका भाकरीवर जगते! 
गावात गेल्यानंतर एक आजी म्हाळसाबाई पवार (वय ८७) यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, की घरात कुणीच नाही, पदरात पैसा नाही. दिवसभर एका भाकरीवरच जगते. या आदिवासी गावाकडे शासकीय यंत्रणांचे मात्र सोयिस्कर दुर्लक्ष होत असल्याचे या सर्व गोष्टीवरून जाणवते. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only five senior women living in whole village