वेरूळ, अजिंठ्यासह पर्यटनस्थळे उघडा! निसर्गकवी महानोर यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

मनोज साखरे
Saturday, 21 November 2020

भारताचे वैभव असलेल्या अजिंठा, वेरूळ लेण्यांच्या परिसरात मी राहतो. महाराष्ट्राचा जवळपास सगळ्याच पर्यटनस्थळांशी माझे दृढ नाते आहे. आठ महिन्यांपासून ही स्थळे बंद आहेत.

औरंगाबाद :  भारताचे वैभव असलेल्या अजिंठा, वेरूळ लेण्यांच्या परिसरात मी राहतो. महाराष्ट्राचा जवळपास सगळ्याच पर्यटनस्थळांशी माझे दृढ नाते आहे. आठ महिन्यांपासून ही स्थळे बंद आहेत. अजिंठा, वेरूळच्या पायथ्याशी सेवेत असलेली भटके, आदिवासी पाचशे, हजार कुटुंबे आहेत. या गरीब कुटुंबांना दुसरा कुठलाही व्यवसाय ठाऊक नाही. उपाशी, अर्धपोटी ही हजारो माणसे भरडली जात आहेत. हे अत्यंत अस्वस्थ करणारे वास्तव आहे. त्यामुळे ही पर्यटनस्थळे उघडावीत, अशी विनंती करणारे पत्र ख्यातनाम निसर्गकवी ना. धों. महानोर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिले आहे.

महानोर यांच्या पत्राचा आशय असा : लोकभावना व वास्तवाचा विचार करून मंदिर, देवालये खुली केली म्हणून आपले अभिनंदन. आठ महिन्यांपासून वेरूळ, अजिंठा ही पर्यटनस्थळे बंद आहेत. पर्यटनामुळे तेथील व्यवसायावर अनेकांची रोजीरोटी अवलंबून आहे. त्यातील अनेक गरीब आहेत. ते रोज कमावतात, रोज खातात. आठ महिन्यांपासून ते कसे जगत असतील, याचा शासनाने विचार करावा. अजिंठा, वेरूळमधील लेण्या साकारताना थोर प्रतिभावंतांच्या हाताची बोटे रक्ताळली, मोडली. डोळे अधू झाले. मरेपर्यंत कुंचला सोडला नाही. त्यांना जगभरच्या लोकांचे आशीर्वाद आहेत. ही स्थळे बंद असल्याने कैलास लेणी, भगवान गौतमबुद्ध, भगवान महावीर यांच्या भेटीला आसुसलेली भारतातील सुजाण माणसे अतिशय निराश आहेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

दबलेला श्‍वास....
मंदिरे, सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे खुली झाली आहेत. आता सर्व पर्यटनस्थळे उघडावीत. पर्यटनस्थळांच्या परिसरात रोजीरोटीवर आयुष्य काढणाऱ्या हजारो दुखळ्या माणसांचा गांभीर्यपूर्वक विचार व्हावा. काही अटी घालून ही पर्यटनस्थळे खुली करावीत. या माणसांचा दबलेला श्‍वास आंदोलनाकडे जाईल, अशी वेळ येऊ देऊ नये, अशी विनंतीही महानोर यांनी पत्रात केली आहे.

अस्वच्छता चिंतनीय
बंदीमुळे वेरूळ, अजिंठा येथील लेण्या व परिसर मोकळा आहे. अति पावसाने परिसर खराब झाला आहे. मोडलेली झाडे-पाचोळा पडला आहे. माकडांसह व अन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यांची विष्ठा, घाण परिसर विद्रुप करणारी असून ही चिंतनीय बाब आहे. तेथील घाण स्वच्छ करणार की घाणीचे साम्राज्य करणार, असा सवालही महानोर यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open Ajanta, Ellora With Other Tourist Spots, Poet Mahnor Wirte To Chief Minister