परभणी जिल्ह्याच्या समस्या लवकरच सुटतील- उद्धव ठाकरे

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : परभणी जिल्हयातील विविध समस्या, अडचणी लोकप्रतिनिधी व शासनाच्या समन्वयाने चर्चेतून सोडविण्यात येणार असुन अशा विभागीय आढावा बैठकींचे नियोजन यापुढेही करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता.नऊ) येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात परभणी जिल्ह्यातील विविध समस्या तसेच अडचणीबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री श्री ठाकरे बोलत होते.

या बैठकीस पर्यावरण, पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, रोहयो मंत्री संदिपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, खासदार संजय जाधव, आमदार सर्वश्री डॉ. राहुल पाटील, सुरेश वरपुडकर, बाबाजानी दुर्राणी, मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव अजोय मेहता, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी आदींसह विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. पृथ्वीराज उपस्थित होत. 

परभणी येथे कृषी विभागाचे उप विभागीय कार्यालय सुरु करण्याबाबत शासनाकडे प्रस्तावपाठवावा त्यास तात्काळ मंजुरी देण्यात येईल. तसेच रिक्त पदांच्या बाबतीत आढावा घेऊन ही पदे एक महिन्यात भरावीत, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी दिले. परभणी जिल्हा क्रीडा संकुलाची अवस्था दयनीय झाली असुन या क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत या संकुलाच्या माध्यमातुन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत अशी अपेक्षाही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. 

साईबाबांचे जन्मस्थळ असलेल्या पाथरीचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय प्रवेशाबाबत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी वैद्यकीय प्रवेशाबाबत असलेली झोन पद्धती तपासुन त्यात सुधारणा करणार असे सांगुन परभणी बाह्यवळण रस्त्यासाठी भुसंपादनाचा विषय मार्गी लावण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. 

परभणी शहराची पिण्याच्या पाण्यासाठीची वाढती गरज लक्षात घेऊन अतिरिक्त पाईपलाईन, भूमिगत गटार योजना, जिल्ह्यातील बंधाऱ्याची कामे गतीने पुर्ण करण्याचे निर्देश श्री ठाकरे यांनी दिले. येलदरी धरणाची गळती दुरुस्त करुन धरणापासुन सिंचनासाठी डावे व उजवे कालवे निर्माण करुन शेतीला मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

उद्योगांना चालना देण्यासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी त्वरित जागा उपलब्ध करण्याबाबतही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. शहरातील झोपडपट्टीधारकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करण्याच्या सुचना श्री ठाकरे यांनी यावेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com