CoronaVirus : लघू व्यावसायिक म्हणताहेत आता बस्स! सुटतोय संयम

अनिलकुमार जमधडे
रविवार, 31 मे 2020

-छोट्या व्यावसायिकांचे दुपारपर्यंत व्यवहार सुरू 
-रिक्षाचालकांची प्रवासी वाहतूक
-गल्लोगल्ली विक्रेत्यांच्या आरोळ्या कानावर 

औरंगाबाद : कोरोनाच्या अनुषंगाने लॉकडाउनमध्ये पुन्हा वाढ झाली. औरंगाबाद रेड झोनमध्ये असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व व्यवसायावर निर्बंध आहेत. असे असले तरीही आता नागरिक आणि व्यावसायिकांचा संयम सुटत आहे. कुटुंबाचा गाडा कसा हाकणार अशी चिंता वाढली आहे. म्हणूनच दुपारी जीवनावश्यक वस्तूविक्रीच्या शिथिल वेळेपर्यंत छोट्या व्यावसायिकांच्या आरोळ्या कानावर पडत आहेत. अनेक छोट्या व्यावसायिकांनी व्यवसायाला प्रारंभ केल्याचे चित्र आहे. 

दुपारपर्यंत व्यवसाय

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची स्थिती कायम आहे. औरंगाबाद रेड झोनमध्ये असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व काही बंद अपेक्षित आहे. मात्र, लोकांचा आता संयम सुटत आहे. त्यामुळेच विविध व्यावसायिक निर्बंध असतानाही दुकाने उघडून व्यवसाय करीत आहेत. रिक्षाचालकांनीही रस्त्यावर उतरून प्रवासी भाडे घेणे सुरू केले आहे. अनेक गॅरेज दुपारी एकपर्यंत उघडली जात आहेत. गल्लोगल्ली फिरणारे भंगार व्यावसायिक तसेच विविध वस्तूंची विक्री करणारे हातगाडी चालक आणि झाडू विक्रेत्यांच्या आरोळ्या कानावर पडत आहेत. छोटे-छोटे दुकानदार, मोबाईल शॉपी, घड्याळ दुरुस्तीचे दुकान, इलेक्ट्रिकल स्टोअर्स, कूलर व्यावसायिक दुपारपर्यंत आपला व्यवसाय करीत आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

कुटुंबाचा गाडा कसा चालवणार

अर्थात व्यवसाय करण्यामागे त्यांच्या कुटुंबाचा गाडा कसा चालवणार असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. दोन ते अडीच महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने कुटुंबाचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न व्यावसायिकांना पडला आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शासनाकडून निराशा

शासन पातळीवरून दिल्ली किंवा केरळ सरकारप्रमाणे छोट्या व्यावसायिकांसह रिक्षाचालक, हातगाडीचालक यांच्या खात्यावर थेट पैसे येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली आहे. खात्यावर पैसे तर आलेच नाहीत, उलट रेशनवर धान्य देण्याची घोषणाही फसवी ठरली आहे. रेशन कार्ड नसतानाही रेशन मिळेल अशी घोषणा शासनाने केली होती, प्रत्यक्षात मात्र कार्डधारकालाही लवकर रेशन मिळत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे कार्डच नाही त्याचा तर प्रश्नच नाही अशी सध्याची अवस्था आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा

संयम सुटत चालला

केंद्र शासनाने पाचव्या लॉकडाउनची घोषणा केली आहे. रेड झोनमध्ये असल्याने जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य व्यवसाय दुकाने बंदच राहणार आहेत. असे असले तरीही प्रत्यक्षात मात्र नागरिकांचा आणि व्यावसायिकांचा संयम सुटत चालला आहे. हे सध्याचे चित्र आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: people Not Bear Lockdown, They Want Relexation