
गेल्या आठ महिन्यांपासुन बंद असलेल्या लग्नसराई करिता कार्तिक महिन्याच्या तुलशी विवाहानंतर शुक्रवारपासून (ता.२७) सुरवात झाली. काल पहिल्याच तारखेला अनेकजण लग्नाच्या बेडीत अडकले.
लिंबेजळगाव (जि.औरंगाबाद) : गेल्या आठ महिन्यांपासुन बंद असलेल्या लग्नसराई करिता कार्तिक महिन्याच्या तुलशी विवाहानंतर शुक्रवारपासून (ता.२७) सुरवात झाली. काल पहिल्याच तारखेला अनेकजण लग्नाच्या बेडीत अडकले. तुलशी विवाहाच्या २६ तारखेनंतर पुढील चार महिने लग्नसराई सुरु राहणार आहे. पुढील दोन महिन्यांचे बुकिंग ही अनेक मंगल कार्यालयात झाले आहे. मात्र मागील आठवड्यात शासनाच्या नवीन नियमानुसार फक्त ५० वऱ्हाडींना परवानगी देण्यात आल्याने ग्रामीण भागातील लग्न हे मंगल कार्यालयाऐवजी आपापल्या शेतावर केली जात आहे.
अनेकजण पुढेही यालाच पसंती देत आहे. सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या रोजच्या नव-नवीन नियमातही संभ्रम निर्माण होत आहे. अनेकजण शहराऐवजी ग्रामीण भागात लग्न हे शेतावर उरकून घेण्यावर पसंती देत आहे. कारण शेतात कुणाचेच झंझट नसल्याचे एका वधुपित्याने सांगितले.मागील आठ महिन्यात अनेकांनी लॉकडाऊनच्या काळात घरातच लग्नकार्य उरकून घेतले. तर अनेक व्हिडिओ काँन्फ्ररन्सद्वारे लग्न लावले. आता तुलशी विवाहानंतर ता.२७ पासुन गैन काळातील खऱ्या अर्थाने लग्नकार्याला सुरवात झाली आहे.
बाजारात खरेदीची लगबग वाढली आहे. ज्यांनी मंगल कार्यालय बुक केले आहे.त्याचा मनात अद्यापही कोरोनाची भीती कायम आहे. मात्र हीच परिस्थिती ग्रामीण भागात कुठेही पाहावयास मिळत नाही. २७ व २८ या दोन तारखेला लिंबेजळगाव (ता.गंगापूर) व परिसरात ६०० ते ८०० वऱ्हाडींच्या उपस्थित लग्न लागले. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्यामुळे ना मास्क ना सॅनिटायझर विना लग्न लागत आहे. सर्वत्र लग्न सोहळ्यातील अत्यावश्यक भाग असलेल्या साउंड सिस्टीमला परवानगी मिळाली नसली तरी सर्वत्र मंडप लाऊडस्पीकर सुरुच आहे.
पन्नास वऱ्हाडी
कोरोनाची दुसरी लाट येणार म्हणून ५० वऱ्हाडींची मर्यादा घालण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात याची पायमल्ली होत आहे. कारण फक्त संबंधित विभागाचे दुर्लक्ष किंवा हातमिळवणी. अनेकजण छोट्या हॉटेलमधेही लग्न उरकून घेत असल्याने त्याचा फटका मंगल कार्यालयाला बसला आहे.
बुकिंग होतेय रद्द
५० वऱ्हाडींची परवानगी असल्याने अनेकजण लॉन्सवर लग्न करण्यासाठी टाळाटाळ करीत आहे व सिस्टीमला परवानगी नसल्याने घोड्याची मिरवणूकही दर्द केली जात असल्याचे लॉन्स मालक सुदर्शन गवळी यांनी सांगितले.
मंडपाला, सिस्टिमला परवानगी मिळावी
लग्न व छोटेखानी कार्यक्रम करण्यासाठी नागरिकांची कार्यालयात मागणी वाढत आहे. मात्र पोलिसांकडुन सिस्टिमला परवानगी नसल्याने अनेकांचा हिरमोड होत आहे. त्याकरता परवानगी मिळावी अशी मागणी विश्वंभर जाधव यांनी केली आहे.
संपादन - गणेश पिटेकर