
आधीच्या काही वर्षांमध्ये पीएचडी पूर्व परीक्षा ‘पेट’ मध्ये अनियमितता आढळून आली होती. त्यातील त्रुटी दूर करुन आता नव्या वर्षात पीएचडीची सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठ करीत आहे.
औरंगाबाद : आधीच्या काही वर्षांमध्ये पीएचडी पूर्व परीक्षा ‘पेट’ मध्ये अनियमितता आढळून आली होती. त्यातील त्रुटी दूर करुन आता नव्या वर्षात पीएचडीची सर्व प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठ करीत आहे. पीएचडीपूर्व परीक्षा ‘पेट’साठीची अर्ज नोंदणीप्रकिया ही नवीन वर्षात १ जानेवारीपासून सुरु करण्यात येईल. नोंदणीसह परीक्षा देखील ऑनलाइन घेण्यात येणार आहे. त्यात विद्यार्थ्यांना घरी बसून परीक्षा देता येईल, असे नियोजन विद्यापीठाने केल्याची माहिती कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी बुधवारी (ता.३०) आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. येवले म्हणाले की, एकूण ४२ विषयांमध्ये ‘पेट’ परीक्षा घेण्यात येईल. या पेटची व्हॅलिडीटी एक वर्षासाठी असेल. पीएचडी व्हायवासाठी यंदा ऑनलाइन पद्धत वापरली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. यापुढे नियमित ऑनलाइन व्हायवा घेण्यात येण्याचा मानस आहे. अचानक लॉकडाऊन झाल्याने ग्रामीण भागातून विद्यापीठात शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांची अडचणी होवू नये, यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना घरी पोहचविण्यासाठी प्रयत्न केले. गरजू आणि जेष्ठ नागिरकांना मदत करत आपली सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.
फाईल ट्रॅकिंग पद्धतीची दखल
मागील वर्षी विद्यापीठाने फाइल ट्रॅकींग पद्धत सुरु केली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आता पोलीस आयुक्तांनी देखील फाईल ट्रॅकिंग पद्धतीच्या एका डेमोची मागणी केली आहे. त्याचा अवलंब पोलिस प्रशासनाकडून करण्यासंदर्भात हालचाली सुरु असल्याचे डॉ. येवले यांनी सांगितले.
परदेशी विद्यार्थ्यांचा कल वाढला
यंदा कोरोनामुळे नव्या शैक्षणिक सत्रासाठी परदेशातील विद्यार्थी विद्यापीठात प्रवेश घेतील का नाही अशी शंका होती. परंतु प्रवेश प्रक्रियेला बाहेरील देशाच्या विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एकूण ११३ परदेशी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्रवेश नोंदणी केली आहे. तर दरवर्षी मोठ्या प्रमाणावर विद्यापीठाचा खर्च होत होता. काटकसरीमुळे ७ कोटी रुपये यंदा वाचले आहेत. हळूहळू विद्यापीठांनी देखील आता कार्पोरेट पद्धतीने कामकाज करण्यास सुरुवात करायला हवी, असेही कुलगुरु म्हणाले. यावेळी प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाट, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.
असे आहे वेळापत्रक
यावेळी पेट पार्ट १ व पार्ट २ अशा दोन पद्धतीने घेण्यात येणार आहे. पार्ट १ मध्ये जनरल अॅप्टीट्यूट असेल, तर पार्ट २ हा मुख्य विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयावर असेल. १ ते ११ जानेवारीदरम्यान शुल्क भरुन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज नोंदणी करायची आहे. २१ जानेवारीला ऑनलाइन अॅडमिट कार्ड विद्यार्थ्यांच्या लॉगइनमध्ये उपलब्ध होईल. ३० जानेवारीला पार्ट १ चा पेपर होईल, त्याचा ऑनलाईन निकाल एक फेब्रुवारीला जाहीर होईल. पार्ट- २ साठी पात्र विद्यार्थ्यांची यादी विषयानुसार ६ फेब्रुवारीला जाहिर होईल. पार्ट टु पेपरसाठी १३ फेब्रुवारीला अॅडमिट कार्ड उपलब्ध होईल. २१ फेब्रुवारीला परीक्षा होईल. २४ फेब्रुवारीला निकाल जाहिर होवून दोन पेपरचा अंतिम निकाल २८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. पेट उत्तीर्ण झालेल्यांना १ मार्चपासून ऑनलाइन पीएचडीसाठी नोंदणी करता येईल. अंतिम तारीख १५ मार्च असेल.
Edited - Ganesh Pitekar