
औरंगाबाद शहरात अनेक ठिकाणी दुचाक्या चोरी करणाऱ्या टोळीचा जिन्सी पोलिसांनी पर्दापाश केला. टोळीत चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील एकास पोलिसांनी शहरातून अटक केली आहे.
औरंगाबाद : शहरात अनेक ठिकाणी दुचाक्या चोरी करणाऱ्या टोळीचा जिन्सी पोलिसांनी पर्दापाश केला. टोळीत चार संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील एकास पोलिसांनी शहरातून अटक केली आहे. पठाण अझमत खान समशेर खान (२५, रा खुलताबाद) असे त्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी दोन दुचाक्या जप्त केल्या आहेत.
या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्याचे एक पथक पेट्रोलींग करत असताना एकजण चोरीची दुचाकी घेऊन मदनी चौकात आल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी केली असता, संशयिताने दुचाकी (एमएच २० सीझेड ९६०३), (एमएच २० सीडब्लु ७६५८) या दोन दुचाकी चोरल्याचे पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दोन्ही दुचाक्या जप्त केल्या आहेत. संशयिताचे साथीदार योगेश गोठवाल राजपूत, शकील, त्रिभुवन (सर्व रा. खुलताबाद) यांच्या मदतीने चोरल्याचीही कबुली पोलिसांना दिली. तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी दुचाकी चोरी केल्याची कबुली देत इतर दुचाक्या त्याचा साथीदार योगेश गोठवाल राजपूत याच्याकडे ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. संशयित पठाण अझमत समशेर खान हा खुलताबाद पलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
जिन्सी पोलिसांनी त्याला अटक करुन तपासासाठी सिडको पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिल्याची माहिती उपनिरीक्षक दत्ता शेळके यांनी दिली. ही कारवाई निरीक्षक व्ही. एम. केंद्रे, पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार संपत राठोड, पोलीस अंमलदार हारुण शेख, नाईक संजय गावंडे, नंदलाल चव्हाण, संतोष बमनात यांनी केली.
Edited - Ganesh Pitekar