प्रहारचे सचिन ढवळे, अपक्ष सिद्धेश्‍वर मुंडे, एमआयएमचे कुणाल खरात यांचा मतमोजणीच्या प्रक्रियेवर आक्षेप

प्रकाश बनकर
Friday, 4 December 2020

मतपत्रिकेवरील मतदान केंद्र प्रमुखांच्या सह्यांची सत्यता पडताळणी करावी, प्रत्येक टेबलवर कोऱ्या मतपत्रिका कशा आढळल्या, प्रत्यक्ष मतदान व झालेले मतदान यात तफावत का आदी आक्षेप प्रहारचे सचिन ढवळे, अपक्ष सिद्धेश्वर मुंडे, एमआयएमचे कुणाल खरात यांच्यासह सहा उमेदवारांनी घेतला गुरुवारी (ता.तीन) रात्री साडेअकराच्या आसपास आक्षेप घेतले होते.

औरंगाबाद : मतपत्रिकेवरील मतदान केंद्र प्रमुखांच्या सह्यांची सत्यता पडताळणी करावी, प्रत्येक टेबलवर कोऱ्या मतपत्रिका कशा आढळल्या, प्रत्यक्ष मतदान व झालेले मतदान यात तफावत का आदी आक्षेप प्रहारचे सचिन ढवळे, अपक्ष सिद्धेश्वर मुंडे, एमआयएमचे कुणाल खरात यांच्यासह सहा उमेदवारांनी गुरुवारी (ता.तीन) रात्री साडेअकराच्या आसपास आक्षेप घेतला होता. या आक्षेपाचे उत्तर दिले जाईल असे आश्वासन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले होते.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची चिकलठाणा एमआयडीसीतील कलाग्राम समोरच्या मराठवाडा रिएल्टर्स प्रा. लि. येथे गुरुवारी सकाळी आठपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतपत्रिकेवर काही मतदारांनी मराठा आरक्षणाविषयी लिहिले. दुसरीकडे काहींनी मोबाईल नंबर तर काहींनी गंमतीशरपणे स्वतःचे नावे लिहिल्याचे प्रकारसमोर आले आहेत. ही सर्व मते बाद होणार आहेत.

मतमोजणी केंद्रावर नो सोशल डिस्टन्सिंग
कलाग्रामच्या मतमोजणी केंद्रावर विविध 35 उमेदवारांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते सकाळीच धडकले होते. त्यामुळे सकाळपासूनच येथे कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली. प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येकाला थर्मलगने तपासून, सॅनिटायझर लावून आत सोडले जात होते. मात्र मध्ये पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी असल्याने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचा फज्जा उडालेला दिसून आला. मोजणीच्या प्रत्यक्षस्थळी मोबाइल बंदी असतानाही अनेकांच्या हातात मोबाइल दिसून आल्याने वंचित बहुजन आघाडीने यावर आक्षेप घेत विभागीय आयुक्‍त सुनील केंद्रेकर यांच्याकडे सकाळच्या सत्रातच तक्रार केली. केंद्रेकर यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले. मात्र पुढे काही कारवाई झालेली दिसून आली नाही.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prahar, MIM, Independents Take Objection On Counting Process Aurangabad Graduate Election Result