दरोडेखोरांच्या हल्ल्यात प्रियशरण महाराज जखमी; गुन्हा दाखल, औरंगाबाद जिल्ह्यातील घटना

नवनाथ इधाटे
Thursday, 12 November 2020

चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमात प्रियशरण महाराज यांच्यावर अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला केल्याने महाराज जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.११) पहाटे घडली.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या आश्रमात प्रियशरण महाराज यांच्यावर अज्ञात सात ते आठ दरोडेखोरांनी हल्ला केल्याने महाराज जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता.११) पहाटे घडली. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात अज्ञात दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्रियशरण महाराज हे मुळचे राजस्थान येथील आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी या परिसरात आश्रम सुरु केला आहे. याशिवाय येथे गोशाळाही ते चालवितात. त्यांच्या आश्रमात महिला व पुरुष असे सेवक आहेत. आश्रमानजीक शेती आहे.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया : मराठा समाजातील विद्यार्थी संभ्रमात, कोणत्या संवर्गातून अर्ज करावा?

येथे काम करणारे त्यांचे अनुयायी राहतात. त्यांचा जास्त वेळ बाहेर गावी सत्संग करण्यात जातो. चौक्यापासून तीन किमीवर लाडसावंगी रस्त्यावर सताळा गावाच्या हद्दीत उंच डोंगरावर प्रियशरण महाराज यांचा आश्रम आहे. बुधवारी पहाटे अज्ञात सात ते आठ दरोडेखोर आले. त्यांनी इमारतीचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पहिल्या खोलीत एक महिला झोपली होती, तिला धमकावले. महाराज कुठे आहे म्हणून विचारणा केली, तिने महाराज वरच्या मजल्यावर असल्याची माहिती दिली असता त्या लोकांनी वरच्या मजल्यावर जाऊन महाराज यांना मारहाण केली. यात महाराज व अज्ञात लोकांमध्ये झटापट झाली. यात प्रियशरण महाराज जखमी झाले. त्यांना औरंगाबाद येथील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच फुलंब्री पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व गुन्हा दाखल केला.

अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यात दोन दिवसांत रक्कम जमा होईल - राज्यमंत्री बच्चू कडू

स्वामी प्रियाशरण महाराजांचा वेदांचा मोठा अभ्यास आहे. ते भारतभर भागवतकथा करतात. इतके मोठे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या, आध्यात्मिकतेला वाहून घेतलेल्या महाराजांवर असा हल्ला होणे हे दुर्दैवी आहे. त्यांना जर शत्रूच नाही तर असा हल्ला का होतो, हा प्रश्‍न आम्हा भक्त मंडळींना पडला आहे.
-अनंत रेणापूरकर, नांदेड

 

संपादन - गणेश पिटेकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyasharan Maharaj Injured In Thieves Attack Aurangabad News