esakal | प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनमोल सागर यांची मोठी कारवाई, वाळूतस्करांचे धाबे दणाणले
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal News

पैठण-फुलंब्री येथील उपविभागीय अधिकारीपदाचा नुकताच प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनमोल सागर यांनी पदभार घेतला.

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनमोल सागर यांची मोठी कारवाई, वाळूतस्करांचे धाबे दणाणले

sakal_logo
By
हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद) : गोदावरी पात्रातील चोरट्या मार्गाने वाळुचे उत्खनन करून वाळु तस्करांनी  हिरडपुरी (ता.पैठण) शिवारात साठा केल्याची माहिती प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनमोल सागर यांना  मिळताच रविवारी (ता. सात) पहाटे तीन वाजता महसूल व पोलिस पथकाने छापा मारून चार लाख ऐंशी हजार रुपये किंमतीची एकशे वीस ब्रास वाळु जप्त केली. पहाटे अचानकपणे ही कारवाई केल्याचे समजताच गोदावरी पट्ट्यातून अवैधरित्या वाळु उपसा करणाऱ्याचे धाबे दणाणले आहे.


पैठण-फुलंब्री येथील उपविभागीय अधिकारीपदाचा नुकताच प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अनमोल सागर यांनी पदभार घेतला. त्यानंतर त्यांनी गौण खनिजाची चोरी रोखण्यासाठी कटाक्षाने पावले उचलली आहेत. श्री.अनमोल यांना हिरडपूरी येथे गोदावरी पात्रातून अवैधरित्या वाळु उपसा करून वाळुसाठा केल्याची माहिती मिळताच त्यांनी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी 'तथा' पैठणचे सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिरडपुरी येथे कारवाईची व्यूहरचना आखून महसुल व पोलिस कर्मचाऱ्याना संयुक्तरित्या कारवाईच्या सुचना दिल्या.

तहसीलदार चंद्रकांत शेळके व पाचोडचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी तात्काळ गोदावरी पट्ट्यात धाव घेतली. गोदावरी पात्रावर वाळु साठ्याचा शोध घेत असताना पाचोडचे मंडळाधिकारी निहालसिंह बहुरे, तलाठी चंदेल ठाकूर, कोतवाल अनिल मिसाळ यांना वाळुसाठा दृष्टीस पडला. तहसीलदार चंद्रकांत शेळके व सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल येरमे यांनी सदरील सापडलेला अंदाजे एकशे वीस ब्रास इतका वाळू साठ्याचा तात्काळ पंचनामा करून तो जप्त केला.


स्वतः प्रशिक्षणार्थी आय ए एस. अनमोल सागर व सहायक पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आल्याने वाळुतस्करांनी धास्ती घेतली असून त्यांनी वाळुपट्ट्यातून आपले बस्तान हलविले आहे. जप्त करण्यात आलेल्या या वाळुसाठ्याची बाजारी किंमत चार लक्ष ८० हजार रुपये इतकी असल्याचे तहसीलदार चंद्रकात शेळके यांनी सांगितले.

औरंगाबादच्या आणखी बातम्या वाचा


गुरुवारी (ता. चार) तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी अचानक या ठिकाणी रात्री तीन वाजेच्या सुमारास भेट देऊन अवैधरीत्या वाळुवाहतूक करणारा एक टेम्पो ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा केला. या घटनेचे विस्मरण होण्यापूर्वीच वाळुतस्करांनी पुन्हा जोमाने वाळु उपसा सुरु केला होता. यावेळी श्री अनमोल सागर म्हणाले,'अवैधरित्या वाळू साठा व वाहतूक करणाऱ्याची गय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

संपादन - गणेश पिटेकर