साहित्यिक, विद्यार्थ्यांचा आधारवड हरपला; भाषा अभ्यासक श्रीकांत तांबे यांचे निधन

अतुल पाटील
Monday, 28 December 2020

ज्येष्ठ साहित्यिक तथा श्री सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. श्रीकांत तांबे (वय ८६) सोमवारी (ता. २८) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

औरंगाबाद : ज्येष्ठ साहित्यिक तथा श्री सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. श्रीकांत तांबे (वय ८६) सोमवारी (ता. २८) सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी रुग्णालय) येथे मंगळवारी (ता.२९) सकाळी दहा वाजता देहदान करण्यात येणार आहे. धारवाड येथे १९३४ मध्ये डॉ. तांबे यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण धारवाड, अहमदनगर, पुणे इथे झाले. बेळगाव, परभणी, बीड ,अहमदनगर आणि औरंगाबाद इथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

 

 

 
 

औरंगाबादच्या सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी १९६३ ते १९९४ पर्यंत काम केले. एवढेच नाही तर इंग्रजी भाषा आणि साहित्याचे विद्यार्थीप्रिय शिक्षक, व्यासंगी प्राध्यापक, महाविद्यालयाच्या उपक्रमात उत्साहाने भाग घेणारे, नव्या पिढीच्या प्राध्यापकांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक अशी तांबे सरांची ख्याती होती. महाविद्यालयात त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट व प्रभावी वक्तृत्वपटुंच्या पिढ्या घडल्या.

 

 

 
 

चांगले प्राध्यापक याबरोबरच इंग्रजी साहित्यातही त्यांचे नाव आहे. ‘म्युजिंग्ज’, ‘वन हंड्रेड अँड वन’ हे दोन इंग्रजी आणि ‘ताजा कलम’ हा मराठी असे तीन कवितासंग्रह, ‘इंग्लिश म्यूज ऑन इंडियन सॉईल’ हा समीक्षात्मक ग्रंथ, आणि ग. प्र. प्रधानांची ‘साता उत्तराची कहाणी’ या कादंबरीचा इंग्रजी अनुवाद ‘अ टेल विथ सेव्हनॲनसर्स’ अशी ग्रंथसंपदा त्यांनी लिहिलेली आहे. औरंगाबादमधील आंतरभारती, राष्ट्र सेवा दल ह्या सामाजिक संस्थांचे डॉ. तांबे आधारस्तंभ होते. पोएट्री सर्कल, विचार प्रकाशन ही व्यासपीठे उभी करण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Professor Shrikant Tambe Passed Away Aurangabad News