Success Stories : मुख्यमंत्र्यांच्या ‘मातोश्री’वर गंगापूरची ‘विशाल’ नजर

बाळासाहेब लोणे 
मंगळवार, 7 एप्रिल 2020


मुख्यमंत्री बंगल्याच्या सुरक्षेची जबाबदारी विशाल खाजेकर यांच्यावर 

गंगापूर (जि. औरंगाबाद) - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावर सुरक्षेसाठी येथील विशाल श्रीकृष्ण खाजेकर यांची निवड झाली आहे. लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून वर्ष २०१८ मध्ये प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळवत पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाली होती. 

विशाल यांचे प्राथमिक शिक्षण नेवासा (जि. अहमदनगर) येथील जिजामाता बाल उद्यान इंग्रजी माध्यमाच्या शाळेत झाले. गंगापूर शहरातील भारतरत्न मदर तेरेसा शाळेत माध्यमिक शाळेत वर्ष २००३ मध्ये दहावीच्या परीक्षा पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण केली. त्यावेळी समाजकल्याण विभागातर्फे शाहू महाराज पुरस्काराने पाच हजार रुपये देऊन गौरवण्यात आले होते. वर्ष २००४ मध्ये शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात माहिती तंत्रज्ञान या शाखेत प्रवेश घेतला. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने वर्ष २००६ मध्ये पुणे येथे काम शोधले; मात्र पदवी नसल्याने अपेक्षेप्रमाणे काम मिळाले नाही. एका कंपनीने सहा महिन्यांत गॅप दिला.

औरंगाबाद परतल्यावर छोटे-मोठे काम करून गुजराण सुरू केली; पण शिक्षणाची ओढ शांत बसू देत नव्हती. वर्ष २००८ मध्ये जालना येथील मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. विशेष प्रावीण्यासह अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. २०११ मध्ये कॉल सेंटरवर पार्टटाइम करून स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्धार केला; पण अभ्यासात मन रमत नव्हते. वर्ष २०१२ मध्ये शिकवणीसाठी पुणे गाठले.

मोठे बंधू राहुल खाजेकर व बहिणीने आर्थिक मदत केली. वर्ष २०१६ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. वर्ष २०१८ मध्ये लागलेल्या निकालात विशाल यांची पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून अंधेरी मुंबई येथील पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली. 
 

स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे असे स्वप्न पाहिले अन् ते पूर्ण केले. सध्या मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यावरील गेटवर मुख्य इन्चार्ज म्हणून आहे. माझ्या यशात मोठ्या भावाचा व बहिणीचा मोठा वाटा आहे. 
- विशाल खाजेकर, पोलिस उपनिरीक्षक 

 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PSI Vishal Khajakar Success Stories