बलात्काऱ्यास मरेपर्यंत जन्मठेप 

अनिल जमधडे
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

अल्पवयीन मुलीवर बलात्कार 
करणाऱ्यास जन्मठेपेची शिक्षा 

नराधमाने आधी बांधून घेतली होती राखी 

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीला ठार मारण्याच्या धमक्‍या देऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणारा आरोपी पवन प्रमोद कुलकर्णी याला मरेपर्यंत जन्मठेप व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. देशपांडे यांनी शुक्रवारी (ता. सात) ठोठावली. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या पवनने पीडित मुलीकडून राखी बांधून घेतल्यानंतर बलात्कार केला. 

मुलगी एकटीच घरात 

फिर्यादीनुसार, पीडित मुलगी ही तिच्या आई-वडील व भावासह राहात होती. मुलीच्या घराखालीच तिचे काका व काकू राहत होते. 12 ऑगस्ट 2017 रोजी मुलीचे आई-वडील बाहेरगावी गेले होते. भाऊ हा दहिहंडीच्या सरावासाठी बाहेर गेला होता. त्यामुळे मुलगी एकटीच घरात होती. रात्री साडेदहाच्या सुमारास ती खाली आली असता, तिचे काका-काकू जेवण करीत होते. 

हेही वाचा : वंचित बहुजन आघाडीची तयारी पुर्ण 

धमक्‍या देवून बलात्कार 

त्यावेळी तिच्या घरासमोर राहणारा पवन प्रमोद कुलकर्णी (वय 26) याने इशारा करीत तिला बोलाविले. त्यावेळी तिने कारण विचारले असता, घरी गेल्यावर सांगतो, असे सांगत, तो राहत असलेल्या घराच्या गच्चीवर तिला जबरदस्तीने नेले. गच्चीवर नेऊन तिला ठार मारण्याच्या धमक्‍या देत व तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला, त्यानंतर तिला हाकलून दिले. घरी रडत आलेल्या मुलीला पाहून काका-काकूंनी मुलीच्या आई-वडिलांना फोन करून सांगितले. त्यानंतर मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारले असता, घडलेला प्रकार तिने सांगितला. 

हेही वाचा : विमानाचे ढोलताशाने स्वागत 

चार वेळा केला बलात्कार 

पवनने घटनेच्या दीड महिन्यापूर्वीही बलात्कार केला होता. त्यानंतरही तीन ते चारवेळा अत्याचार केल्याचे मुलीने आईला सांगितले. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. खटल्यावेळी, सहायक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी आठ जणांच्या साक्ष नोंदविल्या. यात पीडित मुलीसह तिची आई, डॉक्‍टर तसेच घटनेवेळी मुलीला घेऊन जाताना पवन याला पाहिलेल्या घराशेजारच्या महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एस. बी. कोते यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून यू. एच. तायडे यांनी काम पाहिले. ऍड. आहेर यांना ऍड. युवराज फुन्ने यांनी साह्य केले. 

रेल्वेचा मराठवाड्याला पुन्हा बाय-बाय : पण का 

दंडाची रक्कम पीडितेला 

न्यायालयालयाने दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर आरोपीला दोषी ठरवून कलम 363 कलमान्वये पाच वर्षे सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, कलम 376 अन्वये मरेपर्यंत जन्मठेप (नैसर्गिक मृत्युपर्यंत) व 15 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, तर कलम 506 अन्वये दोन वर्षे सक्तमजुरी व अडीच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, दोषी आरोपीला पोक्‍सो कायद्याच्या कलम 6 अन्वये दोषी ठरविण्यात आले; मात्र या कायद्याच्या कलम 42 मधील तरतुदीनंतर वेगळी शिक्षा देण्यात आली नाही. दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rape of a minor girl in Aurangabad