esakal | औरंगाबादेत पाइपलाइन दुरुस्तीसाठी धुळ्याहून आले साहित्य, जुन्या शहरात आणखी चोवीस तास निर्जळी
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Water Pipeline Repairing

जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारी सातशे मिलिमिटर व्‍यासाची पाइपलाइन गुरुवारी (ता. २७) सकाळी एसएससी बोर्डाजवळ फुटली होती. मात्र दुरुस्तीसाठी आवश्‍यक साहित्य शहरात उपलब्ध नसल्याने ते धुळ्याहून आणले गेले.

औरंगाबादेत पाइपलाइन दुरुस्तीसाठी धुळ्याहून आले साहित्य, जुन्या शहरात आणखी चोवीस तास निर्जळी

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : जुन्या शहराला पाणी पुरवठा करणारी सातशे मिलिमिटर व्‍यासाची पाइपलाइन गुरुवारी (ता. २७) सकाळी एसएससी बोर्डाजवळ फुटली होती. मात्र दुरुस्तीसाठी आवश्‍यक साहित्य शहरात उपलब्ध नसल्याने ते धुळ्याहून आणले गेले. त्यानुसार दुरुस्ती सुरू करण्यात आली असली तरी शनिवारी (ता.२८) रात्रीपर्यंत हे काम चालणार आहे. त्यामुळे जुन्या शहरावरील पाणी संकट कायम आहे. शहराच्या पाणी पुरवठ्यात व्यत्यय कायम आहेत. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजता एसएससी बोर्डाजवळ सातशे मिलिमीटर व्यासाची जुनी सिमेंटची पाइपलाइन तब्बल सात मीटर लांबीपर्यंत फुटली.

पाइपलाइनच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सिमेंटचे जॉइंट औरंगाबादेत उपलब्ध नसल्याने ते धुळे येथून आणले गेले. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांच्यासह उपअभियंता बाविस्कर यांनी रात्रीच धुळे गाठले व तेथून शुक्रवारी (ता. २७) पहाटे चार वाजेच्या ते शहरात पोचले. त्यानंतर दुरुस्तीचे काम सुरू झाले. पाइपलाइन बंद असल्याने जुन्या शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. शुक्रवारी बहुतांश भागात पाणीपुरवठाच झाला नाही. काही भागांत उशिराने पाणी मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.


एमजीपीचे कर्मचारी आले मदतीला धावून
सिमेंटची जुनी पाइपलाइन जोडण्याच्या कामाची माहिती एमजेपीकडे (महाराष्ट्र जीवन प्राधिकरण) शहराचा पाणीपुरवठा असताना कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकडे आहे. म्हणून या कर्मचाऱ्यांना पाचारण करून दुरुस्ती सुरू करण्यात आली. तेजराव मानकापे, भानुदास खरात, सयाजी जाधव हे एमजेपीकडे असताना कार्यरत होते, त्यांच्याकरवी वाहिनीची दुरुस्ती केली जात आहे. शनिवारी रात्री उशिरापर्यंत ही दुरुस्ती पूर्ण होईल, असे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी सांगितले.

Edited - Ganesh Pitekar