Lockdown : रिक्षा थांबली; संसाराचा गाडा कसा हाकणार?

अनिलकुमार जमधडे
शुक्रवार, 22 मे 2020

  • हतबल चालक आर्थिक विवंचनेत 
  • शहरात तीस हजार जणांचा रोजगार बुडाला 
  • हप्ते भरण्याचाही प्रश्न कायम 

औरंगाबाद  : शहरात तीस हजार रिक्षाचालक आहेत. बहुतांश जणांनी रिक्षा कर्जावर घेतलेली आहे. दोन महिन्यांपासून रिक्षा बंद असल्याने रिक्षांच्या चाकासोबत कुटुंबाचाही गाडा थांबला आहे. अनेक रिक्षाचालकांची अक्षरश: उपासमार सुरू झाली आहे. आता कर्जाचे हप्ते कसे फेडावे, असा प्रश्नही त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. 

कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्याने प्रत्येकाला संकटाचा सामना करावा लागत आहे. लॉकडाउनमुळे रोज कमावणाऱ्या हातावर पोट भरणाऱ्या रिक्षाचालकांची स्थिती गंभीर झाली आहे. दोन महिन्यांपासून रिक्षाचा व्यवसाय बंद असल्याने रिक्षाचालकांची रोजीरोटी बंद आहे. रिक्षाचालकांना रोज कमावल्याशिवाय चूल पेटवता येत नाही. रोजच्या तुटपुंज्या कमाईवर
उदरनिर्वाह करावा लागतो. लॉकडाउनची या स्थितीमुळे तर रोजीरोटीच बंद झाल्याने रिक्षाचालक हतबल झाले आहेत. त्यांच्यापुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

जाणून घ्या :  नऊ टक्के भागात कोरोना व्यापला तरीही... 

प्रत्येक रिक्षाचालकांचे कमीत-कमी चार ते पाच जणांचे कुटुंब आहे. अनेकांकडे रेशन कार्डही नाहीत. त्यामुळे अक्षरश: उपासमार होत आहे. त्यातच बहुतांश रिक्षा कर्जावर घेतलेल्या असल्याने वित्तीय संस्था हप्त्यासाठी तगादा लावत आहेत. त्यामुळेच रिक्षाचालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत सामान्य रिक्षाचालकांनी मदत कोणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही सामाजिक संघटनांनी केलेल्या तुटपुंज्या रेशनवर काही दिवस निघाले. मात्र, आता पुढे काय, असा प्रश्न रिक्षाचालकांना पडला आहे. अनेकांच्या रिक्षावर मोठे कर्ज आहे. अनेक रिक्षाचालक किरायाने रिक्षा चालवतात, अनेकजण किरायाच्या घरामध्ये राहतात. उत्पन्न बंद झाल्याने सर्वच हतबल झाले आहेत. त्यामुळेच रिक्षाचालकांना आर्थिक मदत करावी अशी मागणी रिक्षाचालक संघटनांकडून करण्यात येत आहे. 

हेही वाचा : चिमुकल्यांनी जोडलेले हात करतात अस्वस्थ   
 
 
दिल्लीच्या धर्तीवर मदत करा 
निसार अहेमद (अध्यक्ष रिक्षाचालक संयुक्त कृती महासंघ) : रिक्षाचालकांवर सध्या उपासमारीने मरण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच रिक्षाचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी; अन्यथा दिल्ली सरकारप्रमाणे रिक्षाचालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत करावी. 
 
रिक्षा सेवा सुरू करा 
शेख नजीर (जिल्हाध्यक्ष भ्रष्टाचार विरोधी रिक्षाचालक-मालक संघटना) : रिक्षा बंद असल्यामुळे चालकांची उपासमार सुरू झाली आहे. त्यामुळे दिल्ली व केरळ सरकारप्रमाणे आर्थिक आर्थिक मदत करावी. त्याचप्रमाणे रिक्षा सेवा सुरू करावी. 
  
रोजीरोटीचा प्रश्न सोडवा 
तानाजी रणखांब (रिक्षाचालक) :
रिक्षा बंद असल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रिक्षा चालवून मिळणाऱ्या रकमेतही ओढाताण असते. आता तर व्यवसाय ठप्प झाल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 

रिक्षाचालकांना आर्थिक मदत हवी 
प्रवीण नाडे :
लॉकडाउनमुळे रिक्षा बंद असल्यामुळे व्यवसाय ठप्प झाला आहे. घर कसे चालवावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने रिक्षाचालकांना आता आर्थिक मदत केली पाहिजे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rickshaw Drivers Lost Income Aurangabad News