एमएसआरडीसीचे कामच भारी... रस्ते होणार फक्त सहा महिन्यांत

Aurangabad City news
Aurangabad City news

औरंगाबाद- राज्य शासनाने शहरातील रस्त्यांसाठी १५२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यातून २० रस्त्यांची कामे केली जाणार असून, रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) सात रस्त्यांची कामे करणार आहे. निधी मंजुरीनंतर अवघ्या चारच दिवसांत एमएसआरडीसीने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत; महापालिका व एमआयडीसीकडील रस्त्यांची अद्याप यादीच समोर आलेली नाही. निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत रस्त्‍यांची कामे केली जाणार असून, निविदा भरण्यासाठी ११ मार्चची मुदत देण्यात आली आहे. 

शहरातील रस्त्यांसाठी महापालिकेने राज्य शासनाला २६३ कोटींच्या निधीची मागणी केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून निधी मिळावा म्हणून पाठपुरावा सुरू होता. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले व शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेची धडपड सुरू होती. दरम्यान, गेल्या महिन्यात मुख्यमंत्र्यांनी शहरातील विकास कामांचा आढावा घेतला होता. यावेळीदेखील रस्त्यांसाठी निधी मिळावी, अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांची यादी सार्वजनिक बांधाकम विभागाची तांत्रिक मंजुरी घेऊन पाठविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नुकतीच ४६३ कोटी रुपयांची १०३ रस्त्यांची यादी राज्य शासनाला पाठविण्यात आली होती; मात्र राज्य शासनाने यापूर्वी पाठविलेल्या २६३ कोटींच्या यादीतील २० रस्त्यांची निवड करीत १५२ कोटी रुपयांचा निधी जाहीर केला.

रस्त्यांची कामे गतीने व दर्जेदार व्हावेत यासाठी महापालिका, रस्ते विकास महामंडळ व एमआयडीसीला रस्ते विभागून देण्यात आले आहेत. अनुक्रमे आठ, सहा, सहा अशी रस्त्यांची विभागणी करण्यात आल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले होते. रस्त्यांची किंमत, लांबी, संख्या शासनाने जाहीर केली; मात्र कोणते रस्ते होणार हे जाहीर केले नव्हते. दरम्यान, रस्ते विकास महामंडळाने त्यांच्या वाट्याला आलेल्या सात रस्त्यांची निविदा प्रसिद्ध केली आहे. ११ मार्च ही निविदा भरण्यासाठी अंतिम तारीख असून, निविदा अंतिम झाल्यानंतर कामे पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देण्यात आला आहे. 

अशी आहेत रस्ते 
 जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते सलीम अली सरोवर रस्त्याचे क्रॉंक्रेटीकरण करणे (१२०० मीटर लांबी, १०.९८ कोटी खर्च). 
वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी रस्त्याचे डांबरीकरण करणे (२,१५० मीटर लांबी, १२.५५ कोटी खर्च) 
 जाफरगेट ते मोंढा नाका आणि जाफर गेट ते आठवडी बाजार रस्त्याचे कॉंक्रेटीकरण करणे (लांबी ९५० मीटर, ९.४३ कोटी खर्च) 
 पोलिस मेस ते गटगटगेट रस्त्याचे कॉंक्रेटीकरण करणे (९५० मीटर लांबी, ७.७५ कोटी खर्च) 
 नौबत दरवाजा ते सिटीचौक पुलासह रस्त्याचे कॉंक्रेटीकरण ( ५३५ मीटर लांबी, ५.७५ कोटी खर्च) 
 मदनी चौक ते सेंट्रल नाका रस्त्याचे डांबरीकरण करणे (७५० मीटर लांबी, ४.२५ कोटी खर्च) 
 गोपाल टी हाऊस ते उत्सव मंगल कार्यालय रस्त्याचे कॉंक्रेटीकरण व औषधीभवन येथील नाल्याचे काम करणे (३३० मीटर लांबी, २.५३ कोटी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com