Corona : रोबोट करणार अवघ्या दहा मिनिटांत निर्जंतुकीकरण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

कोरोनाबाधित रुग्णांच्या खोल्यांचे सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण केले जाते. त्या तुलनेत या रोबोटचा खर्च कमी आहे.

औरंगाबाद : कोरोनाशी लढा देण्यासाठी सध्या विविध प्रयोग सुरू आहेत. कोविड केअर सेंटर, क्वारंटाइन सेंटर निर्जंतुक करण्यासाठी प्रशासनाला मोठी कसरत करावी लागते. त्यावर आता पर्याय उपलब्ध झाला असून, अतिनील किरणांचा वापर करून रुग्णांच्या खोल्या निर्जंतुक करण्यासाठी रोबोट तयार करण्यात आला आहे. शनिवारी (ता.चार) महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्यासमोर एका कंपनीच्या यूव्ही रोबोटचे सादरीकरण केले. 

महापालिकेने रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर; तसेच संपर्कात आलेल्यांसाठी क्वारंटाइन सेंटर सुरू केले आहेत. याठिकाणी सध्या हजारोंच्या संख्येने गर्दी आहे. याठिकाणी दाखल रुग्णांकडून इतरांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी एजन्सीमार्फत निर्जंतुकरणाचे काम सुरू आहे; मात्र त्यासाठी मोठा वेळ लागतो. क्वारंटाइन सेंटरमधील एखादा नागरिक कोरोनाबाधित आढळून आला तर रुग्णाची खोली चोवीस तासांसाठी रिकामी ठेवावी लागते; मात्र यूव्ही रोबोटच्या मदतीने अवघ्या १० मिनिटांत २० स्क्वेअरमीटरची एक खोली निर्जंतुक केली जाते.

रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या बसचे देखील निर्जंतुकीकरण करण्यासाठी हे रोबोट फायदेशीर आहे. रोबोटची ने-आण करणे देखील सोपे आहे. सध्या सोडियम हायपोक्लोराईडने निर्जंतुकीकरण केले जाते. त्या तुलनेत या रोबोटचा खर्च कमी आहे, असे प्रशासकांना सादरीकरणादरम्यान कंपनीतर्फे सांगण्यात आले. महापालिकेत या उपकरणाचा उपयोग प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येणार आहे. ते उपयुक्त ठरल्याचा अहवाल आल्यावर पुढचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासकांनी स्पष्ट केले. 

शासनस्तरावर पडताळणी
भारतात हे तंत्रज्ञान नवे असले तरी इतर देशांमध्ये अशा प्रकारच्या रोबोटचा वापर सुरू आहे. सध्या शासनस्तरावर कंपनीतर्फे सादरीकरण केले जात आहे. वापर उपयुक्त ठरला तर पुढील प्रक्रिया होईल, असे कंपनीतर्फे प्रवीण तायाळ यांनी सांगण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: robot will sterilize