गुडन्यूज... १६ बळी गेल्यनंतर सारीला ब्रेक 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

सारीचा सोमवारी एकही रुग्ण आढळला नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले. १६ बळी घेतलेल्या सारीच्या रुग्णांची संख्या गेल्या दीड महिन्यांत २७५ वर पोचली आहे. सोमवारी त्यात भर पडली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

औरंगाबाद : तब्बल १६ बळी घेतल्यानंतर सोमवारी (ता.२७) सारीच्या वाढत्या रुग्णसंख्येला ब्रेक लागला. दिवसभरात एकही रुग्ण आढळला नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा जोगदंड यांनी सांगितले. गेल्या दीड महिन्यांत सारीच्या रुग्णांची संख्या २७५ वर पोचली आहे. सोमवारी त्यात भर पडली नसल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.  

सारी (सिव्हिअरली अॅक्युट रेस्पायरेटरी इलनेस) आजाराने कोरोनापेक्षा जास्त बळी गेल्याने नागरिकांमध्ये भिती वातावरण आहे. या आजाराने आतापर्यंत तब्बल १६ बळी गेले आहेत. २४ मार्चला सारीमुळे पहिला बळी गेला होता. त्यानंतर तीनच दिवसांत या रुग्णांची संख्या आठवर गेली होती. पुढे सारीचे चार-पाच रुग्ण दररोज आढळत असल्याने रविवारपर्यंत सारी बाधितांचा आकडा २७५ पर्यंत पोचला. सोमवारी शहरात सारीचा एकही रुग्ण आढळला नाही.

३८ डिग्रीपेक्षा जास्त ताप, धाप लागणे, श्वसनाला त्रास, ऑक्सिजनची रक्तातील पातळी कमी होणे ही लक्षणे ‘सारी’ व ‘कोविड १९’ ची लक्षणे आहेत. या दोन्हींच्या लक्षणांत साम्य असल्यामुळे ‘सारी’च्या प्रत्येक रुग्णाची ‘कोविड- १९’ तपासणी डॉक्टर सध्या करून घेत आहेत. आंबट पदार्थांमध्ये सायट्रिक अॅसिड असते. म्हणून आंबट व तेलकट पदार्थ खाणे टाळावे. वैयक्तिक स्वच्छता पाळावी, सर्दी खोकला, ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एका सर्वेक्षणानुसार, वयोगटानुसार विचार केल्यास ६ ते १५ या वयोगटात ‘सारी’ तीव्र स्वरूपात, तर १६ ते २५ व ४५ ते ५५ या वयोगटाला सारीचा धोका आहे. 

‘सारी’चे दोन कोरोना पॉझिटिव्ह 
२० मार्चपासून आतापर्यंत ‘घाटी’त ८७ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातील दोन रुग्ण कोरोना (कोविड-१९) पॉझिटिव्ह होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला; दुसरा रुग्ण उपचार घेत आहे. एकूण ८७ पैकी बारा जणांचे मृत्यू झाले. हे प्रमाण पूर्वीच्या सरासरीएवढेच असल्याचा घाटी रुग्णालयाचा दावा आहे. 

मास्क न वापरणाऱ्या २५ जणांवर कारवाई 
मास्क न वापरता रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू करण्यात आली असून, आत्तापर्यंत ६५३ जणांकडून तीन लाख २६ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. सोमवारी (ता.२७) नऊ प्रभागांत कारवाई करून २४ जणांकडून १२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई सुरूच राहणार असून, नागरिकांनी अत्यावश्‍यक कामांसाठी बाहेर पडताना मास्‍क वापरावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sari News Aurangabad