१६ बळी घेतलेल्या ‘सारी’चा औरंगाबादेत पुन्हा शिरकाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

‘सारी’च्या आजाराचे चार रुग्ण असल्याचे समोर येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आतापर्यंत ‘सारी’च्या ३१८ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले, त्यापैकी २९७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, सहा जणांचा अहवाल बाकी आहेत.

औरंगाबाद : कोरोनापाठोपाठ शहरात ‘सारी’च्या (सिव्हिअरली अ‍ॅक्यूट रेस्परेटरी इलनेस) आजाराने अनेकांचे बळी घेतले. गेल्या काही दिवसांपासून या आजाराचे रुग्ण कमी झाले होते; मात्र नव्याने चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३३१ एवढी झली आहे. 

शहरात ‘सारी’च्या आजाराने डोके वर काढले होते. मार्च महिन्याच्या ‘सारी’च्या आजाराने एका बालकाचा पहिला बळी घेतला. त्यानंतर रुग्ण झपाट्याने वाढत गेले व तब्बल १६ जणांचे बळी या आजाराने घेतले. ‘सारी’ची लक्षणे कोरोनासारखीच असल्यामुळे या रुग्णांची अधिक काळजी घेतली जात आहे. तसेच कोरोनाची चाचणीही घेतली जात आहे. त्‍यात आत्तापर्यंत दहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. गेल्या काही दिवसांत ‘सारी’चे रुग्ण कमी झाले होते; मात्र आता पुन्हा ‘सारी’च्या आजाराचे रुग्ण सापडले आहेत. बुधवारी ‘सारी’च्या आजाराचे चार रुग्ण असल्याचे समोर येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. आतापर्यंत ‘सारी’च्या ३१८ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले, त्यापैकी २९७ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, सहा जणांचा अहवाल बाकी आहेत.

हा ब्लॅक अॅण्ड व्हॉइट फोटो आपोआप होतो कलर, जाणून घ्या कारण...

धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित

कोरोनाबाधित वसाहतींची शंभरीपार 
शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, रोज नवीन वसाहतींमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी (ता.२०) त्यात आणखी सात गल्लींची भर पडली. त्यामुळे कोरोनाबाधित वसाहतींची संख्या शंभरावर गेली आहे. मराठा गल्ली-उस्मानपुरा, बालाजीनगर, माणिकनगर, इंदिरानगर, शरीफ कॉलनी, लिमयेवाडी, आझम कॉलनी या वसाहतींमध्ये कोरोनाचे बुधवारी रुग्ण आढळून आले. 

शहरात कोरोनाची दहशत कायम आहे. प्रशासकीयस्तरावर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक लॉकडाउनची भाषा केली जात असली तरी ही साखळी अद्याप तुटलेली नाही. रोज नवनवीन वसाहतींमध्ये रुग्ण आढळून येत आहेत. सोमवारपर्यंत (ता.१८) ९० वसाहतींमध्ये कोरोना पोचला होता. मंगळवारी (ता.१९) त्यात सहा नवीन वसाहतींची भर पडली. बुधवारी सकाळी ४१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची संख्या १११७ एवढी झाली आहे. नव्या रुग्णांमुळे कोरोनाबाधित भागही वाढले आहेत. नव्या सात वसाहतींमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात मराठा गल्ली- उस्मानपुरा, बालाजीनगर, माणिकनगर, इंदिरानगर, शरीफ कॉलनी, लिमयेवाडी, आझम कॉलनी या वसाहतींचा समावेश आहे. 

मराठा गल्लीत संपर्कातून लागण 
गुरुगोविंदसिंगपुरा भागातील मराठा गल्लीमध्ये संपर्कातल्या संपर्कातून एकास लागण झाली आहे. त्यामुळे या गल्लीतील रस्ते सील करण्यात आले असून, जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. माणिकनगर भागात बाहेरून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. शिवशंकर कॉलनीपाठोपाठ बालाजीनगरातही दोघेजण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे बालाजीनगरच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. आकाशवाणीच्या पाठीमागे असलेल्या मित्रनगर भागातील लिमयेवाडीत एकजण संपर्कातून पॉझिटिव्ह आढळून आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sari News Aurangabad