esakal | औरंगाबाद शहरातील शाळा तीन जानेवारीपर्यंत राहणार बंद, मात्र शिक्षकांना शाळेत यावे लागेल
sakal

बोलून बातमी शोधा

0school_141_1

पुणे, ठाणे पाठोपाठ औरंगाबाद येथील महापालिका क्षेत्रात येणाऱ्या शाळा तीन जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद शिक्षकांना मात्र शाळेत यावे लागेल.

औरंगाबाद शहरातील शाळा तीन जानेवारीपर्यंत राहणार बंद, मात्र शिक्षकांना शाळेत यावे लागेल

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळेची घंटा वाजणार, असे शासनाकडून निश्चित केले गेले आहे. मात्र, स्थानिक प्रशासनाने परिस्थितीनुसार शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कळवले होते. त्यानुसार औरंगाबादेतील शाळा सुरु होणार का? या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शनिवारी (ता.२१) पुणे, ठाणे पाठोपाठ औरंगाबाद येथील महापालिका क्षेत्रात येणाऱ्या शाळा तीन जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी बंद शिक्षकांना मात्र शाळेत यावे लागेल. वीस डिसेंबरला पुन्हा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल. सद्यःस्थितीत तीन जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांसाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक अस्तिककुमार पांडेय यांनी शनिवारी दिली आहे.


विद्यार्थी हे कोरोना संसर्ग वहन करण्यास फार मोठे साधन ठरू शकतात. कारण शाळेत एकत्र येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समुहातून असा घात होऊ शकतो. एखादी थोडी चूकही मोठी महाग पडू शकते. गत नऊ महिन्यापासून मनामनात कोरोनाची भीती बसली असून, दिल्लीसारख्या ठिकाणी परत कोरोनाची लाट सुरू झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही कोरोनाची पुन्हा लाट येऊ शकते, असे म्हटले जाते. निश्चितच शाळा सुरू झाल्यानंतर ही महामारीची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासनाकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून, शिक्षणविभाग कामाला लागला आहे. येत्या २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार आहे. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता व बालकांच्या आरोग्याचा विचार करता आपला पाल्य शाळेत पाठवायचा की नाही? हा निर्णय पालकांचा आहे. त्याबाबत पालक वर्ग मोठ्या प्रमाणात अनुत्सुक असल्याचे दिसून येते. कोरोना संसर्गामुळे निश्चीतच २०२०-२१ हे शैक्षणिक सत्र वाया जाणार हे नक्की. अनेक पालकांच्या मते शाळेआधी पाल्याचे आरोग्य महत्त्वाचे आहे.

संपादन - गणेश पिटेकर