उस्मानाबाद जिल्ह्यातील निवासी शाळा वगळता इतर शाळा सुरु होणार, जिल्हाधिकारी दिवेगावकरांचा निर्णय

तानाजी जाधवर
Saturday, 21 November 2020

उस्मानाबाद  जिल्ह्यामध्ये निवासी शाळा वगळता इतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे.

उस्मानाबाद  : जिल्ह्यामध्ये निवासी शाळा वगळता इतर शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे. जिल्ह्यातील शिक्षकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असुन त्यातील साधारण एकच टक्के शिक्षकांना संसर्ग असुन सुदैवाने सर्वांची प्रकृती उत्तम आहे. संसर्ग होऊ नये, यासाठी नियमावली तयार करुन शाळांनी त्याची कडक अंमलबजावणी होण्यासाठी स्वतःजिल्हाधिकारी दिवेगावकर हे नजर ठेवणार आहेत. एक आठवड्यानंतर निश्चितपणाने परिस्थितीचा अंदाज येईल. त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही श्री. दिवेगावकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

गेल्या काही सात ते आठ महिन्यांपासून शाळांची घंटा वाजलेली नाही. आता शाळा सुरू करण्याबाबत शासनाने स्थानिक पातळीवर अधिकार घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. जिल्ह्याची परिस्थिती पाहता सध्या रुग्णाची संख्या अत्यंत कमी आहे. कोरोनाचे संकट काही प्रमाणात टळलेले असले तरी यंत्रणा अजूनही सतर्क असल्याचे दिसुन येत आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी जिल्ह्यातील शाळातील शिक्षकांची चाचणी करण्यात आली. साडेतीन हजार शिक्षकांच्या चाचणीनंतर जिल्ह्यात साधारण तीस ते ३२ शिक्षकांना संसर्ग असल्याचे लक्षात आले आहे. हे प्रमाण एक टक्क्यांच्या आसपास आहे.

त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. मात्र काही महिन्यांपूर्वी हेच प्रमाण टक्केवारीत २० टक्के इतके होते. त्यामुळे त्या तुलनेत आता प्रमाणही कमी झाले असुन लोकामध्ये जागृती निर्माण झालेली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील शाळा सुरु करुन पहिल्या चार ते पाच दिवसांमध्ये परिस्थितीचा अंदाज येणार आहे. त्यानंतर संसर्ग वाढल्यास वेगळा निर्णय घेण्याचा विचारही प्रशासनाने केला आहे. पण त्या अगोदर काळजी घेण्याची तयारी प्रशासनाने घेतली आहे. शाळांच्या बाबतीत अधिकाधिक चांगली उपाययोजना तसेच पालकांनीही पाल्यांच्या आरोग्याच्या काळजीबाबत नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार त्याची अंमलबजावणी केल्यास धोका होणार नसल्याचा विश्वास सध्या तरी व्यक्त होत आहे.
 

 

जिल्ह्यातील शाळा सूरु करण्यासाठी प्रशासनाने संपुर्ण तयारी केलेली आहे. संसर्गाचा विचार केल्यास काहीप्रमाणात शिक्षकांना कोरोनाची लागन झाली आहे. त्याचे प्रमाण अत्यल्प असुन त्यामुळे काही दिवस शाळा सूरु करुन परिस्थितीचा अंदाज घेतला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये निवासी शाळा सूरु करण्यात येणार नाहीत. त्या ठिकाणी मुल निवासी असल्याने ते स्वतःची काळजी घेण्यासाठी तितके सक्षम नसल्याने त्याबाबतीत धोका उद्भवण्याची शक्यता गृहित धरुन त्यावर काही दिवसांनी निर्णय घेतला जाणार आहे.
- कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Despite Resident Schools Other Open In Osamanabad District, Said Collector Devegaonkar