अमेरिकेतील नवरा परत द्या; औरंगाबादच्या विवाहितेचे वैजापुरात आंदोलन

भानुदास धामणे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अमेरिकेत असलेल्या पतीस बोलावून तोडगा काढण्याचे ठरले असून, सायंकाळी उपोषण सोडण्यात येऊन, धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. प्राजक्ता उदावंत असे उपोषणकत्या विवाहितेचे नाव आहे. 

वैजापूर (जि. औरंगाबाद) - सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने चक्क वैजापूर शहरातील सासरच्यांच्या दुकानासमोरच सोमवारी (ता. 13) उपोषण सुरू करून धरणे आंदोलन केले.

अमेरिकास्थित आपला पती आपल्याला मिळवून द्यावा, अशी या विवाहितेची मागणी आहे. दरम्यान, या कौटुंबिक वादात पोलिसांसह तहसीलदार महेंद्र गिरजे यांनी मध्यस्थी करून दोन्हीकडच्या कुटुंबांतच सामंजस्याने वाद मिटवावा, अशी सूचना केली. आता अमेरिकेत असलेल्या पतीस बोलावून तोडगा काढण्याचे ठरले असून, सायंकाळी उपोषण सोडण्यात येऊन, धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. प्राजक्ता उदावंत असे उपोषणकत्या विवाहितेचे नाव आहे. 

औरंगाबाद येथील विजयकुमार डहाळे यांची मुलगी प्राजक्ता हिचा विवाह रीतीरिवाजाप्रमाणे वैजापूर येथील प्रसिद्ध सराफा व्यावसायिक सचिन उदावंत यांचा मुलगा सत्यजित याच्यासोबत झाला. सत्यजित नोकरीनिमित्त अमेरिकेत वास्तव्यास आहे. विवाहानंतर काही दिवस प्राजक्ता ही अमेरिकेत पतीसोबत राहिली. गेल्या नोव्हेंबरमध्ये प्राजक्तास वैजापूर येथे सोडून सत्यजित अमेरिकेला गेला. तेव्हापासून त्याने पत्नीशी संपर्क केला नाही. याला सासरची मंडळीच जबाबदार असल्याचा आरोप प्राजक्ता हिने केला आहे.

सासरा सचिन हरिभाऊ उदावंत, सासू सुशीला सचिन उदावंत, दीर सागर सचिन उदावंत व जाऊ हे याला जबाबदार असल्याचे प्राजक्ताचे म्हणणे आहे. माझ्या पतीला परत आणून द्या, या मागणीसाठी प्राजक्ताने माहेरचे कुटुंबीय,
समाजातील काही नागरिकांसह धरणे आंदोलन, उपोषण सुरू केले. या आंदोलनाला रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), टायगर ग्रुप, अखिल भारतीय सुवर्णकार संघटनेसह मीनाताई सोनार, सुधाकर टाक, विजयराव डहाळे, भगवानराव शहाणे, मुकुंद नागरे, धनंजय पळशेरकर, भगवान उदावंत, अनिताताई शहाणे यांनी पाठिंबा देत ते उपोषणातही सहभागी झाले. 
 
चर्चेद्वारे काढणार तोडगा 
औरंगाबादला माहेरी राहणाऱ्या प्राजक्ता उदावंत यांनी वैजापुरात येऊन सासरच्यांच्या सराफा दुकानासमोरच उपोषण सुरू केले. त्यामुळे दिवसभर संपूर्ण शहरभर सर्वत्र याचीच चर्चा होती. अखेर पोलिसांसह तहसीलदार महेंद्र गिरजे यांनी मध्यस्थी करीत दोन्ही कुटुंबीयांनी आपापसात चर्चेद्वारे वाद मिटविण्याचा सल्ला दिला. त्याला प्रतिसाद देत अखेर अमेरिकास्थित पतीस
येथे बोलावून यात तोडगा काढण्याचे ठरले. त्यानंतर उपोषण, धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. 
 

हेही वाचा -

इब्राहिमखान गारद्याचे अस्सल चित्र औरंगाबादेत, मूळ गाव कोणते? 

पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुस्लीम? जाणून घ्या... 

या ठिकाणी आहे थोरले बाजीरावांची समाधी, झाली दुरवस्था, पाहा PHotos


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She Protest For Her Husband At Vaijapur