Shivjayanti 2020 : औरंगाबादच्या शिवजयंतीचे अनोखे पैलू

अतुल पाटील
Tuesday, 18 February 2020

  • होनाजीनगरात अध्यक्ष, सचिव नाहीच
  • मुकूंदवाडीत एक गाव एक शिवजन्मोत्सव
  • पुंडलिकनगरात छत्रपती महिला उत्सव समिती
  • क्रांती चौकात तीनवर्षापासून शिवपारायण

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती गेल्या चार वर्षापासून शहरात धुमधडाक्यात साजरी होतेय. शिवजयंती साजरी करण्याचे नवनवे फंडे शिवप्रेमी आणत आहेत. एक गाव एक शिवजन्मोत्सव, शिवपारायण, हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, महिलांची उत्सव समिती तसेच एकेठिकाणी तर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष, सचिवच नाहीत. अशा अनोख्या पद्धतीने सण साजरा होत असताना यानिमित्त कुणी शपथ तर कुणी महिला संरक्षणासाठी मोबाइल ॲप तयार करणार आहे.

अध्यक्ष, सचिवाविना शिवजयंती

होनाजीनगरची वस्ती १५ वर्षापूर्वी अस्तिवात आली. नव्या कालनीत एकाच झेंड्याखाली एकत्र येवू शकतील, अशी शिवजयंती साजरी करायचे ठरले. ते करताना कुठलीही समिती नसेल, त्यासाठी अध्यक्ष, सचिव नसेल, असा निर्णय घेण्यात आला. होनाजीनगर - रामेश्वरनगरी - वानखेडेनगरची मिळून समिती आहे. स्वेच्छेने निधी जमा करताना राजकारण्यांकडे हात पसरले जात नाहीत.

नक्की वाचा : शिवजयंतीच्या निमित्ताने महिला सुरक्षेसाठी बनवले ॲप

गेल्यावेळी तीन लाख तर, यावर्षी सहा लाख रुपये जमा झाले आहेत. जमा पैशांतून गेल्यावेळी विद्यार्थ्यांना आणि शहिदांच्या कुटूंबियांना मदत देण्यात आली. यावर्षी हर्सूल कारागृहासमोरील खुल्या जागेत जॉगिंग ट्रॅक निर्मितीसाठी मदत दिली जाणार आहे. असे राजगौरव वानखेडे, बंडू सोमवंशी यांनी सांगितले.

मुकुंदवाडीत एकच शिवजन्मोत्सव

मुकूंदवाडीत चार वर्षापासून एक गाव एक शिवजन्मोत्सव या संकल्पनेस सुरवात झाली. गावातील तरुण मुलांनी एकत्र येवून ठरवले. ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन केले. शिवजयंती साजरी करण्यासाठी गावातील ११ मंडळे एकत्र आली आहेत.

संबधित बातमी : छत्रपती शिवाजी महाराजांवरील उर्दू पुस्तके संपली, मागणी प्रचंड

यात शिवनेरी मित्रमंडळ, शिवप्रेमी मित्रमंडळ, हरीश डांगे मित्रमंडळ, धर्मवीर संभाजी राजे प्रतिष्ठान, शिवभोले मित्रमंडळ, गरुडझेप मित्रमंडळ, वास्तव मित्रमंडळांचा समावेश आहे. पारंपरिक पोषाख, महिलांचा पुढाकार असतो, असे समितीचे मार्गदर्शक बाबासाहेब डांगे यांनी सांगितले. पोलिस विभागाकडूनही मुकूंदवाडीला आदर्श शिवजयंतीचे बक्षीस मिळाले आहे.

पुंडलिकनगरात महिलांचाच पुढाकार

पुंडलिकनगर येथे शिवछत्रपती महिला उत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकातील पुतळ्याला सकाळी महिलाच दुग्धाभिषेक करतील. सायंकाळी छञपतींच्या पुतळ्याची मिरवणुक काढण्यात येणार आहे. त्यानंतर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा : असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर, पत्र अजूनही सुरक्षित

यावर्षी समितीच्या अध्यक्षपदी सुवर्णा तुपे, कार्याध्यक्ष जयश्री दाभाडे, स्वागताध्यक्ष कावेरी पावशे, उपाध्यक्ष ललिता बोरसे, माणिक दौड, सुभद्रा आंधळे, अनुराधा पवार, कोषाध्यक्ष उषा घोळवे, लता मुठ्ठे, सचिव यमुना पांडे, मंगल पंडित, सुनीता साबळे यांची निवड केली आहे.

क्रांती चौकात होतेय शिवपारायण

क्रांती चौकात तीन वर्षापासून शिवपारायण केले जाते. शहरातील शाळांमधील पाचवी ते दहावीचे विद्यार्थी याठिकाणी येवून पुस्तके वाचतात. गेल्यावर्षी ४५ शाळांतील सात हजार विद्यार्थी आले होते. यावर्षी ८० शाळांमधून ९ हजार विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आहे. प्रा. चंद्रकांत भराट लिखित छत्रपती कोणाचे हे पुस्तक वाचायला दिले जाते.

हेदेखील वाचा : संताप येईल शिवाजी महाराजांच्या मूळ गावातील गढीची अवस्था पहाल तर

प्रा. भराट म्हणाले, की यातून सलोखा निर्माण होत असून मौलवी, इमाम, मंत्रीही शिवपारायणात बसत आहेत. जयंतीत ढोल ताशांच्या आवाजापेक्षा शिवरायांचे विचार डोक्यात जायला हवेत. डोक्यावर घेवून नाचण्यापेक्षा डोक्यात घेवून शिवजयंती साजरी करायला लावण्याचा हा प्रयत्न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Jayanti 2020 Aurangabad News