
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी (ता.१२) औरंगाबाद शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. एक हजार ८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेवरुन शिवसेना व भाजपमध्ये पोस्टरबाजी रंगली आहे.
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी (ता.१२) औरंगाबाद शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. एक हजार ८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेवरुन शिवसेना व भाजपमध्ये पोस्टरबाजी रंगली आहे. शहरात ठिकठिकाणी भाजपने पोस्टर लावून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभाराचे पोस्टर लावले आहेत. फडणवीस यांनी १६८० कोटी रुपये औरंगाबादच्या जलवाहिनीसाठी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यापासून भाजपने श्रेयाचे राजकारणास सुरवात केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईहुन औरंगाबादेत दुपारी एक वाजता आगमन होईल. गरवारे स्टेडियमवर दुपारी एक वाजून २० मिनिटांनी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होईल. सफारी पार्क व औरंगाबादेतील रस्त्यांच्या कामांचे आभासी माध्यमातून भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
औरंगाबादकरांची शिवसेनेकडून फसवणूक
आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ केला जात आहे. यातून पुन्हा एकदा औरंगाबादकरांची फसवणूक शिवसेनेकडून केली जात असल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला आहे.