Shivjayanti 2020 : या गावात आहे महाराष्ट्रातलं दुसरं शिवाजी महाराजांचं मंदिर...

प्रकाश बनकर
Wednesday, 19 February 2020

डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येत १९ फेब्रुवारी २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर स्थापन केले.

औरंगाबाद : गावठी दारू बनवणारे, टुकार गाव अशी आधी काहीशी ओळख असलेल्या त्या गावाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन डागाळलेली प्रतिमा बदलली आहे. गावकऱ्यांनी स्वीकारलेल्या शिवविचारांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर स्थापन केले आहे. 

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार या गावची ओळख आता पंचक्रोशीत शिवविचारांचे गाव अशी झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या गावाची ओळख ही गावठी दारू बनवणाऱ्या दारुड्यांचे गाव अशी डागाळलेली होती, यामुळे ही डागाळलेली प्रतिमा सुधारण्यासाठी गावातील लोकांनी एकत्र येत १९ फेब्रुवारी २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर स्थापन केले.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...

याशिवाय मंदिरामुळे गावाची एकजूट झाली आणि गाव व्यसनमुक्त झाले, असे मंदिर समितीचे अध्यक्ष प्रदीप जगताप पाटील यांनी सांगितले. या मंदिरातच गावातील विद्यार्थ्यांसाठी एक वाचनालय स्थापन केले आहे. यामध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी पुस्तके ठेवण्यात आलीआहेत व गावातील विद्यार्थ्यांना शिवविचारांच्या माध्यमातून विज्ञान तंत्रज्ञानाकडे घेऊन जाण्याचा हा एक प्रयत्न केला जात आहे. 

लोकवर्गणीतून उभारले मंदिर 

गावाची प्रतिमा सुधारत एक आदर्श गाव बनवण्यासाठी प्रदीप जगताप यांच्यासह गावकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणी करीत छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारले. यासाठी आठ लाख रुपयांचा खर्च आला, तो खर्चही लोकवर्गणीतून उभा करण्यात आल्याचे जगताप यांनी सांगितले. मंदिरात येणाऱ्यांना फुल-हार याऐवजी पुस्तके देण्यात येतात. विचारांची देवान-घेवाण मोठ्या प्रमाणावर केली जाते. 

बाजेवर टाकून आणले मायलेकीचे मृतदेह  

मंदिरात हे चालतात नियमित उपक्रम 

  • छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात रोज आरती होते. 
  • शासकीय योजना व गावाच्या विकासासंदर्भात नियमित चर्चा होते. 
  • दरवर्षी गावातील पाच ते सहा महिलांचे कन्यादान या मंदिर समितीतर्फे करण्यात येते. 
  • वाचनालयाच्या माध्यमातून दोन विद्यार्थी पोलिस भरतीत निवडले गेले आहे. 
  • शिवविचारांना विज्ञान-तंत्रज्ञानाची जोड देत गावाला पुढे नेण्याचा प्रयत्न यातून केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार अंगीकारले तर गावासोबत देशाचेही भले आणि प्रत्येक गोष्टी सकारात्मक बघण्याचे बळ मिळते. आमच्या गावाची प्रतिमाही डागाळलेली होती, ती शिवविचारांनीच सुधारली. हा सुविचार आमची दुसरी तिसरी पिढी जपत पुढे घेऊन जाणार आहे. भविष्यात हे गाव पर्यटनस्थळ करण्याचा आमचा मानस आहे. 
-प्रदीप जगताप पाटील, अध्यक्ष, मंदिर समिती, जळकी बाजार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivaji Maharaj Temple In Jalki Bazar Aurangabad Shivjayanti News