सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयात १४ वाघ; जंगल सफारीचे काम पूर्ण होईपर्यंत वाढणार संख्या

माधव इतबारे
Sunday, 27 December 2020

महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात शुक्रवारी (ता. २५) समृद्धी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिल्याने वाघांची संख्या तब्बल १४ वर गेली आहे.

औरंगाबाद: महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालयात शुक्रवारी (ता. २५) समृद्धी या वाघिणीने पाच बछड्यांना जन्म दिल्याने वाघांची संख्या तब्बल १४ वर गेली आहे. प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. मिटमिटा भागात जंगल सफारी सुरू होण्यापूर्वी वाघांची संख्या २५ पर्यंत नेण्यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासन प्रयत्नशिल आहे.

 महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान मराठवाड्यासह विदर्भ, खानदेशातील नागरिकांसाठीचे आकर्षणाचे केंद्र आहे. शाळकरी मुलांसह लाखो पर्यटक प्राणिसंग्रहालयाला भेट देतात. मात्र अपुरी जागा, देखभाल दुरुस्तीकडे महापालिकेकडून झालेले दुर्लक्ष यामुळे प्राणिसंग्रहालय अडचणीत आले होते. येथील प्राण्यांना आता मिटमिटा भागातील जंगल सफारीमध्ये हलविण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीतून सुमारे पावणेदोनशे कोटी रुपये खर्च केला जात आहे.

शेतकऱ्याचा माल थेट ग्राहकांच्या दारी; भाजीपाल्याची घरोघरी विक्री

पहिल्या टप्प्यातील कामाची निविदा स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे अंतिम केली जात आहे. लवकरच जंगल सफारीच्या कामाला सुरवात होईल. या ठिकाणी वाघ, बिबट्यांसह इतर हिंस्र प्राणी मोकळ्या वातावरणात असतील. नागरिकांना जाळीदार वाहनातून जंगल सफारीचा आनंद घेता येईल. त्यासाठी प्राणिसंग्रहालयातील वाघांच्या संख्येत वाढ केली जाणार आहे.

तशा सूचना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केल्या असल्याचे प्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे यांनी सांगितले. जंगल सफारी सुरू होईपर्यंत वाघांची संख्या २५ एवढी होऊ शकते, असे श्री. नाईकवाडे यांनी नमूद केले. 

कौतुकास्पद! सौर ऊर्जेतून औरंगाबाद जिल्ह्यातील शाळा बनली स्वयंपूर्ण

जागेअभावी सुरू होते विलगीकरण 
राज्यातील इतर प्राणिसंग्रहालयाचा विचार करता औरंगाबादेत वाघांचा जन्मदर सर्वाधिक आहे. मात्र प्राणिसंग्रहालयात सध्या आहेत त्या प्राण्यांसाठीच जागा अपुरी आहे. त्यामुळे वाघ-वाघिणीला काही काळ वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जात होते. आता जंगल सफारी होत असल्याने त्यांना अधिवासात सोडले जात आहे. गतवर्षी दोन वाघ मुंबईला देण्यात आले होते.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddharth Garden and Zoo 14 tiger number will increase