औरंगाबादेत विदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी मानक कार्यपद्धती, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा बडगा

मधुकर कांबळे
Monday, 28 December 2020

परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने यादृष्टीने मानक कार्यपद्धती तयार केली आहे.

औरंगाबाद : परदेशातून आलेल्या प्रवाशांमुळे कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने यादृष्टीने मानक कार्यपद्धती तयार केली आहे. या कार्यपद्धतीची संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. नसता साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी (ता. २७) बैठक झाली.

 

 
 

विदेशातून आलेल्या प्रवाशांसाठी विशेषता: ब्रिटनमधून आलेल्यासाठी मानक कार्यपद्धती सर्वानुमते ठरविण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, आरोग्य अधिकारी डॉ निता पाडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री शेळके आदी उपस्थित होते.

 

 

मानक कार्यपद्धती.
० परदेशातून आलेले विशेषत: ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची भारतीय विमान प्राधिकरणाने प्रवाशांची ऑफिशिअल यादी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांकडे सादर करावी.
० परदेशातून आलेले सर्व प्रवाशांना विमानतळावरुन महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या बसमधून थेट संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल करावे. तसेच यामध्ये सशुल्क आरोग्यसेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांना द वन हॉटेल, तर नि:शुल्क आरोग्यसेवा घेऊ इच्छिणाऱ्यांना एमसीईडीच्या विश्रामगृहात ठेवावे.
० प्रवाशी भारतात दाखल झाल्याचा दिवस पहिला दिवस ग्राह्य मानण्यात येईल. त्यापुढे ५ - ७ व्या दिवशी संबंधित प्रवाशाची आरटी पीसीआर चाचणी केल्यानंतर, सातव्या दिवशी तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्या प्रवाशाला नियमानुसार स्थलांतरीत केले जाईल.
० आरटीपीसीआर चाचणीचा नमुना केवळ घाटी रुग्णालय औरंगाबाद येथेच पाठविण्यात येईल आणि तोच अहवाल ग्राह्य मानला जाईल. पॉजिटीव्ह रुग्णांचे नमुने घाटीमार्फत पुणे येथे डब्ल्यूजीएससाठी पाठविले जातील.
० आरटीपीसीआर चाचणी नेगेटीव्ह आल्यास प्रवाशाला घरी जाऊ दिले जाईल. मात्र २८ दिवस निरीक्षणाखाली राहतील.
० आरटीपीसीआरमध्ये पॉजिटीव्ह येणाऱ्यांना स्वतंत्र अलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाईल. सशुल्क सेवेसाठी धूत रुग्णालय तर निःशुल्क सेवेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात स्थलांतरीत केले जाईल.
० पॉजिटीव्ह रुग्णांच्या निकटसंपर्कात आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल.
० पॉजिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची संपर्कात आल्यापासून ५ ते १० व्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे.

 

Edited - Ganesh Pitekar

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SOP For Foreign Returned Passengers, If Not Follow Then Action Aurangabad News