जमिनीत पुरेसा ओलावाच नाही, सोयाबीन पेरणीची करू नका घाई

सुषेन जाधव
Thursday, 18 June 2020

शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात तक्रारी येत आहेत. बियाणे कमी प्रमाणात उगवते, काही उगवतच नाही तर काही ठिकाणी बियाणे जमिनीतच सडत असल्याच्याही तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. याशिवाय मृगात पेरणी करण्यासाठी पुरेशा ओलीअभावी शेतकऱ्यांनी घाई करु नये. सुरवातीला वाहणारा पाऊस झाला तरी जमिनीचे तापमान कमी झालेले नसते, तरी शेतकरी पेरणी करतात, याही बाबी समोर आल्या आहेत.

औरंगाबाद: शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यासंदर्भात तक्रारी येत आहेत. बियाणे कमी प्रमाणात उगवते, काही उगवतच नाही तर काही ठिकाणी बियाणे जमिनीतच सडत असल्याच्याही तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. याशिवाय मृगात पेरणी करण्यासाठी पुरेशा ओलीअभावी शेतकऱ्यांनी घाई करु नये. सुरवातीला वाहणारा पाऊस झाला तरी जमिनीचे तापमान कमी झालेले नसते, तरी शेतकरी पेरणी करतात, याही बाबी समोर आल्या आहेत.

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे संचालक डॉ. सु. बा. पवार यांच्या मते कोणतेही पीक तीन ते चार इंच पाऊस (६५ ते १०० मिलीमीटर) झाल्याशिवाय पेरणी करु नये. उन्हाळाभर जमीन तापल्याने जमिनीचे तापमान कमी झालेले नसते, त्यामुळे पुरेशी ओल राहण्यास चांगल्या पावसाची गरज असते. कमी पावसात पेरणी केल्यास हेल्दी रोप होत नाही. पुरेशी ओल आणि अन्नद्रव्ये मिळाली नाही की, जोमदार पीक येत नाही. सध्या मराठवाड्यातील बीड, मंठा, घनसावंगी, गेवराई आदि भागात पुरसा पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करु नये.

हेही वाचा- Video: ‘ती’ राबते, सर्वांचे मन जपते पण तिच्या मनासारखं होतं का?

उगवणशक्ती तपासा
घरचे बियाणे असेल तर त्याचे उगवणक्षमता तपासावी, याशिवाय बियाणे विकत घेतले तर मुठभर दाणे शिल्लक ठेवावेत, तसेच पावती जपून ठेवावी. त्याला बुरशीचा प्रादूर्भाव आहे का याची तपासणी करावी. गत हंगामात सोयाबीन काढणीपश्‍चात असतानाच पाऊस झाला होता, त्यावेळी बुरशीनाशकाची फवारणी केली होती का हेही पाहणे गरजेचे आहे.

प्रामुख्याने सोयाबीनच्या एकावर एक अशा चार थप्पी लावू नयेत कारण सोयाबीनचे आवरण पातळ असल्याने लवकर खराब होते, परिणामी उगवणक्षमता कमी होते. सोयाबीन हे तीन सेंटीमीटरपेक्षा अधिक खोलीवर पेरणी करु नये, केल्यास उगवण क्षमतेवर परिणाम होतो. त्यामुळे अडीच-तीन सेंमीवर खोलीपेक्षा जास्त खोल बियाणे पडणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे. तूर, मका, कपाशीचे सहा सेमिपर्यंत खोलीवर पडले तरी उगवते.

अशी करा बीजप्रक्रिया
उत्पन्नात वाढ होण्यासाठी घरच्या बियाण्याची बीजप्रक्रिया करावी. व्हिटाव्हॅक्स बुरशीनाशकाची तीन ते चार ग्रॅम प्रति किलोस लागवडीपूर्वी बियाणे प्रक्रिया करावी. त्यानंतर जिवाणू संवंर्धकाची प्रक्रिया रायझोबियम आणि स्फूरद विरघळणारे जिवाणू संवर्धक याची २५ ग्रॅम प्रतिकिलो किंवा दहा मिली प्रति किलो द्रवरुप असेल तर बीजप्रक्रिया करावी.

ज्या शेतकऱ्याचे घरचे बियाणे असेल मळणीवेळेस आरपीएम (मशिनचा स्पीड ३००ते चारशे फेरे प्रति मिनीट) असावी. दरम्यान, आर्द्रता १३ ते १४ टक्के दरम्यान असावी. बियाण्याच्या बाह्य आवरणास इजा पोहोचू नये याची काळजी घ्यावी. साठवणूक करताना चार पेक्षा जास्त थप्पी ठेऊ नये, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Soyabin Sowing Cultivation Maharashtra Marathi News