अँटीजेन टेस्टच्या सक्तीने एसटी प्रवाशांमध्ये धास्ती, औरंगाबाद डेपोतील विदारक चित्र !  

अनिलकुमार जमधडे
Monday, 14 September 2020

  • -शहरात येणाऱ्या प्रवाशांना सक्ती 
  • -बाहेरगावी जाणाऱ्यांकडे काणाडोळा 
  • -प्रवाशांमध्ये नाराजीचे सूर 

औरंगाबाद : एसटी बस सुरू झाल्यानंतर कुठल्याही कटकटीशिवाय प्रवास करता येईल असे राज्य शासनानेच जाहीर केले होते. त्यानुसार राज्यात कुठेही नसताना औरंगबादेत मात्र एसटी प्रवाशांना सक्तीने अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. त्यामुळेच प्रवासी वर्गात नाराजी तर आहेच; मात्र सातत्याने ताणतणावाचे प्रसंग निर्माण होत आहेत. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाच महिन्यांनंतर २० ऑगस्टपासून एसटी बस सुरू झाली. शासनाने प्रवासी वाहतूक सुरू करताना ई-पास किंवा वैद्यकीय प्रमाणपत्राची प्रवाशांना गरज राहणार नाही असे स्पष्ट केले होते. तरीही औरंगाबादला मध्यवर्ती बसस्थानक व सिडको बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने अँटीजेन टेस्ट करण्यास भाग पाडले जात आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना रांगेमध्ये उभे करताना फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एसटीवर होतोय परिणाम 
कोरोनामुळे एसटी बससेवेवर मोठा परिणाम झाला आहे. यापुढे सामाजिक अंतर राखता यावे यासाठी केवळ २२ प्रवासी घेऊनच एसटी धावणार आहे. मुळात प्रवासी कमी झाल्याने अजूनही एसटीचे प्रचंड उत्पन्न बुडत आहे. त्यातच आता एसटीचा प्रवासीवर्ग वाढत असतानाच शहरातील दोन्ही बसस्थानकांत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची अँटीजेन टेस्ट सुरू केल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. 

जाणारे प्रवासी वगळले 
शहरात येणाऱ्या प्रवाशांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत असली तरीही शहरातून अन्य शहरात जाणाऱ्या प्रवाशांची मात्र टेस्ट करण्यात येत नाही. केवळ शहरात बस आल्यानंतर प्रत्येक प्रवाशांच्या रांगा लावून त्याच्या टेस्ट केल्या जात आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गासाठी शहरातून बाहेर जाणारा प्रवासी कारणीभूत ठरणार नाही काय, असा प्रश्न विचारला जात आहे. 
बॉक्स 

इतिहासात पहिल्यांदाच 
इतिहासात पहिल्यांदाच पाच महिने इतका प्रदीर्घ काळ एसटी बस बंद ठेवावी लागली आहे. लॉकडाउनमुळे एसटीला रोज अंदाजे २२ कोटी रुपयांची आर्थिक झळ सोसावी लागली. या पाच महिन्यांत तब्बल अडीच हजार कोटींपेक्षा अधिक उत्पन्न बुडाले आहे. एसटीचा एकत्रित संचित तोटा सहा हजार कोटींच्याही पुढे गेला आहे.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST passengers due to forced antigen test Aurangabad news