चटका लावणारी "मॅट्रिक' ची कहाणी 

अनिल जमधडे
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

59 वी राज्य नाट्य स्पर्धा 

अंतिम फेरीला दमदार सुरवात 

औरंगाबाद : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित 59 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीची दमदार सुरवात झाली आहे. एकूण 46 नाटके या स्पर्धेत सादर होणार आहेत. 

सांस्कृतिक पर्वणी 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाट्यगृह आणि तापडिया नाट्यगृह अशा दोन ठिकाणी ही नाटके सादर होणार आहेत. दोन नाट्यगृहांत सादर होणाऱ्या नाटकांच्या वेळा गैरसोयीच्या आहेत. धावपळ- दगदगीच्या आल्याबद्दल नाट्यरसिकांमध्ये नाराजी दिसत आहे. मात्र अंतिम फेरी औरंगाबाद शहरात होत असल्याने ही स्थानिक नाट्यरसिकांसाठी एक सांस्कृतिक पर्वणी आहे. मध्यवर्ती नाट्यगृहाची उपलब्धता आणि स्पर्धा आयोजनातील अन्य अडचणी यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात संध्याकाळी पाच वाजता आणि शहरातील तापडिया नाट्यगृहात रात्री साडेआठ वाजता अशा नाटकांच्या वेळा आहेत. 

हेही वाचा : विमानाचे ढोलताशाने स्वागत 

नाना प्रकारचे नाटक 

स्पर्धेत नानाविध जातकुळीची (जॉनरची) नाटके सादर होणार आहेत. राजकीय, सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक, गूढरम्य, वैचारिक अशा नाटकांसोबतच अर्थातच विडंबनात्मक, विनोदी नाटकेही स्पर्धेत आहेत. अशा विषयांचे वैविध्य, कथानके, सादरीकरणाच्या तांत्रिक बाजूंचे म्हणजे प्रामुख्याने नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, यातील कल्पकता अशा सर्व बाबतीत नावीन्य आणि कल्पकता असलेली ही नाटके सलग पाहायला मिळणे ही बाब दुर्मिळ आहे. ती संधी यानिमित्ताने शहरवासीयांना मिळणार आहे. रंगजाणिवा, सखोल आणि प्रगल्भ करणाराच हा सगळा अनुभव असणार आहे. 

रेल्वेचा मराठवाड्याला पुन्हा बाय-बाय : पण का 

नाट्यशास्त्र विभाग 

औरंगाबाद शहरात राज्यातील पहिला विद्यापीठीय स्तरावरील नाट्यशास्त्र विषयाचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे. त्यामुळे गेल्या सुमारे पन्नास वर्षांत नाट्यशास्त्र शिकलेले हजारो उमेदवार आज व्यावसायिक मराठी नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि कलाक्षेत्र गाजवत आहेत. आज नाट्यरसिकांचीही अभिरुची त्यामुळे उंचावत गेलेली आहे. 

चटका लावणारी "मॅट्रिक' ची कहाणी

उद्‌घाटनाच्या दिवशीचा प्रारंभाचा नाट्यप्रयोग हा मॅट्रिक या नाटकाचा होता. मराठवाड्यातील एक दमदार तरुण लेखक-दिग्दर्शक प्रवीण पाटेकर यांचे हे दोनअंकी नाटक वर्धमान मेडिकल ऍण्ड एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेतर्फे सादर झाले. 

हेही वाचा : वंचित बहुजन आघाडीची तयारी पुर्ण 

नाट्यरसिकांची गर्दी 

औरंगाबाद केंद्रावरील प्राथमिक फेरीत नंबर पटकाविलेले हे नाटक ही मुळात प्रवीण पाटेकर आणि त्यांच्या चमूने गाजविलेली एक एकांकिका आहे. तिला मुंबई, पुणे, चंदीगड व अन्य ठिकाणच्या अनेक स्पर्धांतून यापूर्वी भरपूर बक्षिसे मिळालेली आहेत. त्यामुळे नाटकास रसिकांनी विशेषतः युवावर्गाने मोठी गर्दी केली होती. 

चटका लावणारी कहाणी 

ग्रामीण भागातील गरीब शेतकरी कुटुंबातील मुलींच्या शिक्षणातील अडीअडचणी, समाजाचा प्रतिगामी दृष्टिकोन आदींवर मात करीत शिकणाऱ्या आणि तिला शिकविणाऱ्या कष्टाळू झुंजार आई-बापाची ही कहाणी रसिकांना चटका लावून गेली. सर्व कलावंतांनी मनापासून केलेला अभिनय, वास्तवदर्शी नेपथ्य, बासरी व अन्य तालवाद्यांचे लाइव्ह पार्श्‍वसंगीत आदींमुळे प्रस्तुत नाटकाने रसिकांची मने जिंकली. विशेषतः मध्यवर्ती भूमिका करणारी पृथ्वी आनंद काळे या मुलीची अभिनयाची समज विलक्षण प्रगल्भ आहे. मराठवाड्यातील विशीतील दमदार कलावंतांमध्ये प्रशांत गीते, सुनील, प्रवीण पाटेकर, पृथ्वी काळे या नाटकातील कलावंत मंडळींच्या पुढील शानदार वाटचालीचे आश्‍वासक संकेत या "मॅट्रिक'मधून मिळाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State drama competition In Aurangabad