येळकोट : लैंगिकतेची "बोल्ड' चर्चा 

सुधीर सेवेकर
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

59 वी राज्यनाट्य स्पर्धा- अंतिम फेरी 

औरंगाबाद : सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या राज्यनाट्य स्पर्धेत गोवा हेही एक केंद्र असते. यंदा त्या केंद्राच्या प्राथमिक फेरीत एकोणीस नाट्यप्रयोग सादर झाले. त्यात नंबर पटकावून "येळकोट' हे नाटक अंतिम फेरीसाठी औरंगाबादेत आले. ते सादर करणारी श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज बांदिवडे ही संस्था सातत्याने स्पर्धेत भाग घेणारी आणि आजवर अनेकदा बक्षिसे मिळविलेली गोव्यातील एक महत्त्वाची नाट्यसंस्था आहे. 

गाजलेले नाटक 

"येळकोट' हे नाटक प्रख्यात लेखक श्‍याम मनोहर यांचे पंचविसीतील वर्षांपूर्वीचे एक गाजलेले नाटक आहे. कादंबरी, कथा आणि नाट्यलेखन अशा तिन्ही आकृतिबंधात श्‍याम मनोहर यांनी विपुल लेखन केलेले आहे. त्यांना अनेक पुरस्कारही आहेत. शिवाय त्यांचे लेखन अनेक भाषांतून भाषांतरित झालेले आहे. (प्रियंका आणि दोन चोर हे श्‍याम मनोहर यांचे असेच एक लोकप्रिय नाटक अनेक नाट्यस्पर्धांतून अजूनही वारंवार सादर होत असते.) 
श्‍याम मनोहर यांच्या लोकप्रियतेचे एक कारण म्हणजे ते मानवी जीवन स्वभाव आणि वर्तन यातील विसंगती शोधून त्यावर चुरचुरीत शैलीत सडेतोड लेखन करतात. उपरोधात्मक सूर लावत त्या विसंगतीची ते सविस्तर चर्चा आणि विश्‍लेषण करतात. 

रेल्वेचा मराठवाड्याला पुन्हा बाय-बाय : पण का 

लैंगिक जीवन 

येळकोट या नाटकात त्यांनी मध्यमवर्गीय माणसाचे लैंगिक जीवन, त्याबाबतच्या त्याच्या आशा अपेक्षा, त्याबाबतच्या त्याच्या फॅन्टसीज असा विषय घेतलेला आहे. विषय पंचवीस-तीस वर्षांपूर्वी बोल्ड मानला गेला. आजही तो बोल्डच आहे. कारण आपल्या लैंगिक जीवनाबद्दल आपण सहसा खुलेपणाने बोलत नाही. सांगत नाही. आणि इथे तर ते रंगमंचावर लेखक-दिग्दर्शकाने मांडलेले आहे. 

हेही वाचा : विमानाचे ढोलताशाने स्वागत 

विवाहीत जोडप्याची कथा 

मानवी सुखाचा लैंगिक जीवन हा नेहमीच एक महत्त्वाचा भाग असतो. मात्र त्याविषयीचे शास्त्रीय शिक्षण दिले जात नाही किंवा त्याबद्दलची दृष्टीही दिली जात नाही. त्यामुळे मग अनेक विसंगती, विकृती आणि गफलती निर्माण होतात. वैचारिक गोंधळ निर्माण होतो. कसा? तो या नाटकातील दोन नवविवाहित जोडप्यांच्या माध्यमातून लेखक रंगमंचावर मांडतो. सर्व कलावंतांनी नाटकाची जातकुळी लक्षात घेऊन पुरेशा मोकळेपणाने अभिनय केल्याने व त्यांच्या गतिमान फार्सिकल हालचालींमुळे नाटक पाहताना मजा येते. परंतु नेपथ्याची मांडणी आणखीन थोडी मोकळी व ऐसपैस केली असती, तर कलावंतांच्या हालचालींना कॉम्पॅक्‍ट नेपथ्यामुळे मर्यादा पडल्या नसत्या. जीवनात बॅलन्स अर्थात समतोल हवा हे व्यक्त करणारा पार्श्‍वबाजूचा एक मोठा लाकडी तराजू सूचक होता. अंतिम फेरीतील बहुतांश नाटकांचे प्रयोग सहसा सुविहितच होत असतात. तसाच येळकोटचाही प्रयोग झाला. 

हेही वाचा : वंचित बहुजन आघाडीची तयारी पुर्ण 

अशी आहे टीम 

येळकोट. लेखक श्‍याम मनोहर. दिग्दर्शक अजित केरकर, नेपथ्य शंभुनाथ केरकर. प्रकाशयोजना ः श्रीनिवास उसगावकर, संगीत ः तानाजी गावडे. रंगभूषा ः खुशबू, वेशभूषा ः वीणा. कलावंत साध्वी, मुनैसा, संस्कृती, काशीनाथ, अमोघ, राघोला, अभिषेक, शिवम आदी. 
सादरकर्ते ः श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदिवडे गोवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State drama competition In Aurangabad