मार्फोसीस : एक रोमॅंटीक हिरो 

सुधीर सेवेकर
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

59 वी राज्य नाट्यस्पर्धा - अंतिम फेरी 

औरंगाबाद : मार्फोसीस : प्रसाद एक लोकप्रिय रोमॅंटिक हिरो आहे. त्याला त्याचा एक लेखक मित्र आव्हान देतो की, तू दिग्दर्शक दादाकाकाच्या "मार्फोसीस' या निर्माणधीन नाटकातील माणसं ही मध्यवर्ती भूमिका करून दाखव. दादाकाका रंगभूमीस समर्पित ज्येष्ठ; परंतु स्वभावाने अत्यंत तिरसट असे रंगकर्मी आहेत. त्यांचे घर हेच रंगकर्मीचे जणू एक नाट्यशाळा झालेले आहे. त्यांनी मागे एकदा या प्रसादला झिडकारून अव्हेरलेले असते; परंतु दादाकाकाचा मोठेपणा, दबदबा हे जाणून प्रसाद त्यांच्याकडे जातो. 

आरंभी दादाकाका प्रसादला नकार देतात; पण नंतर माणसाची मध्यवर्ती भूमिका देण्यास तयार होतात. अट एकच असते, प्रसादने स्वतःला पूर्णपणे विसरायचे, रिकामे करून घ्यायचे, पाटी कोरी करून घ्यायची आणि मग त्या माणसाच्या मध्यवर्ती भूमिकेत शिरायचे; पण त्यासाठी लागणारा विरह, गरिबांप्रतीची तळमळ, सच्ची प्रीती असा कुठलाच अनुभव प्रत्यक्ष जीवनात प्रसादने कधी घेतलेला नसतो. त्यामुळे त्याला प्रयत्न करूनही मानस पुरेशा ताकदीने रंगविता येत नाही.

हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना!

दिग्दर्शक दादाकाका यांच्या लक्षात हे येते आणि ते त्यांची एक अभिनेत्री शिष्या दिशा हिच्या मदतीने, प्रसादला प्रत्यक्ष जीवनात विरहवेदना, सच्ची प्रीती, गरिबांप्रतीची तळमळ हे सगळे अनुभव खोलवर मिळतील अशी योजना आखतात. ही सगळी प्रक्रिया नटाने एखादी भूमिका कशी जिवंत करायची याचे नाट्यशास्त्रीय प्रशिक्षणच असते. 

या प्रक्रियेत प्रसादमध्ये हळूहळू खूप बदल होत जातो. असा बदल होणे म्हणजेच "मार्फासीस'; परंतु या प्रक्रियेत इथे घडते असे की, खरा प्रसाद कोणता आणि तो करीत असलेला मानस कोणता, या द्वंद्वात कलावंत प्रसाद अडकतो आणि त्याची तडफड सुरू होते. ती इतकी वाढते की प्रसादला हॉस्पिटलात दाखल करावे लागते. याला जबाबदार कोण? "मातीस ओले करून तिला आकार देणारा कुंभार? त्याची ती प्रक्रियापद्धती की त्या मातीची गुणवत्ता?' असे प्रश्‍न उभे करीत हे नाटक संपते. 

हेही वाचा : सत्तेतल्या नेत्यांनो, वायफळ बडबड करू नका  

काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या सर्कल थिएटर ग्रुप या संस्थेने हेच नाटक मूळ हिंदीत सादर केलेले आहे. प्रस्तुत मराठी प्रयोग इंदूरच्या नाट्यभारती या प्रख्यात संस्थेने सादर केले. नेपथ्य, प्रकाश योजना, कल्पक वापर, कोरसचा वापर असे या नाटकाची अनेक बलस्थाने आहेत. 

-मूळ लेखक ऋषिकेश वैद्य 
-मराठी अनुवाद - अमोल दामले 
-दिग्दर्शक श्रीराम जोग 
-नेपथ्य- अनिरुद्ध कोरीकेरे 
-संगीत शशिकांत किरकिरे 
-प्रकाशयोजना अभिजीत कळमकर 
-कलावंत - प्रतीक्षा बेलसरे, सौजन्य लघाटे, श्रुतिका जोग, विकास दिंडोरकर, लोकेश नीमगावकर, सलोनी खटावकर, सुवर्णा गोडबोले, स्वानंद डिडोळकर, प्रांजली सरवटे, अनंत मुंगी इत्यादी. 
-सादरकर्ते - नाट्यभारती, इंदूर 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: State drama competition In Aurangabad