esakal | शिवरायांच्या पुतळ्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने दिली धडक... 
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad City news

तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्द दिला होता. मात्र, ३० महिने उलटले तरी अद्याप पायाभरणीचेच काम सुरू आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी महापालिकेत धाव घेत प्रशासकांना जाब विचारला. 

शिवरायांच्या पुतळ्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने दिली धडक... 

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याचे क्रांती चौकातील काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, कामाची गती वाढविण्यात यावी व पुढील शिवजयंतीपर्यंत ते पूर्ण करावे, अशी मागणी करत मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. सात) महापालिकेत धडक दिली. यासंदर्भात शनिवारी (ता. आठ) बैठक घेऊन काम गतीने करण्याचे नियोजन केले जाईल, असे आश्‍वासन प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी शिष्टमंडळाला दिले. 

क्रांती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढविण्याची मागणी शिवप्रेमींतून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. वारंवार पाठपुरावा करून महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर १९ फेब्रुवारी २०१८ ला कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी हे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा शब्दही दिला होता. मात्र, ३० महिने उलटले तरी अद्याप पायाभरणीचेच काम सुरू आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी महापालिकेत धाव घेतली. त्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याशी शिष्टमंडळाने चर्चा केली. काम अत्यंत संथ गतीने होत असल्याबद्दल शिष्टमंडळाने संताप व्यक्त केला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आगामी शिवजयंतीपूर्वी काम पूर्ण झाले पाहिजे; अन्यथा निर्माण होणाऱ्या उद्रेकाला महापालिकाच जबाबदार राहील, असा इशारा दिला. त्यावर श्री. पांडेय यांनी शनिवारी क्रांती चौकात शहर अभियंता सखाराम पानझडे पाहणी करतील. कामाला गती देण्यासाठी कंत्राटदारांसोबत चर्चा करण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. उद्या सकाळी दहा वाजता पानझडे यांच्यासोबत बैठक होणार असल्याचे माजी नगरसेवक अभिजित देशमुख यांनी सांगितले. यावेळी आमदार अंबादास दानवे, मनोज गायके, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, सुरेश वाकडे, रेखा वहाटुळे, राजेंद्र दाते पाटील, योगेश औताडे, किशोर चव्हाण, बाळू औताडे, ज्ञानेश्वर शेळके, अनुराधा सुर्यवंशी, श्रीराम पवार, शिवा जगताप, रविंद्र तांगडे, अजय गंडे, वैभव बोडखे, अमोल साळुंखे, विशाल वेताळ, विकीराजे पाटील, तातेराव पाटील, पंढरीनाथ काकडे, संजय जाधव, राहुल भांबे, सुभाष सुर्यवंशी, विलास औताडे, कल्याण औताडे, कल्याण शिंदे, शुभम जगताप, ईश्वर भुमे, रविंद्र वहाटुळे, संजय जाधव यांची उपस्थिती होती. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

पवार कुटुंबीयांना करणार मदत 
महापालिकेने दमडीमहल भागात श्रीराम पवार यांच्या घरावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे. तत्कालीन आयुक्तांनी त्यांना जागेसंदर्भात पत्र दिले आहे. मात्र मालमत्ता विभाग व नगर रचना विभागाने हा विषय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवला आहे. गुरुवारी झालेल्या कारवाईमुळे त्यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, त्यांना जागा देण्यासंदर्भात कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्‍वासन दिले.