शहरातील लोकांनी संभाजीनगर असाच औरंगाबादचा उल्लेख केला पाहिजे : सुभाष देसाई

माधव इतबारे
Saturday, 16 January 2021

शहरात झपाट्याने विकास कामे होत असून, देशात गाजलेला कचरा प्रश्न आता मार्गी लागला आहे.

औरंगाबाद : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षांपूर्वी शहराचे संभाजीनगर असे नामकरण केले आहे. शहरातील लोकांनी संभाजीनगर असाच औरंगाबादचा उल्लेख केला पाहिजे. प्रशासकीयस्तरावर हा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल असा मला विश्वास आहे असे सुभाष देसाई यांनी सांगितले. शनिवारी (ता.१६) ते येथे पत्रकारांशी बोलत होते.

सुपर संभाजीनगर करणार  
शहरात झपाट्याने विकास कामे होत असून, देशात गाजलेला कचरा प्रश्न आता मार्गी लागला आहे. एक हजार ६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा नारळ फुटला आहे. त्यामुळे लवकरच पाणीप्रश्न मार्गी लागेल. शहर स्मार्ट होत आहे. त्याला अधिक उंचीवर न्यायचे आहे. सुपर संभाजीनगर करायचे आहे, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शनिवारी झाले. पडेगाव कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. त्यांनी सुपर संभाजीनगर करायचे असे सांगितले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर,  आमदार संजय शिरसाट जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांची उपस्थिती होती.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

गर्दी नसल्याने नाराजी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अमरप्रित चौकातील म्युरलचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला फक्त शंभर ते दीडशे नागरिकांची उपस्थिती असल्याने सुभाष देसाई यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमानंतर त्यांनी भाषण करणेही टाळले.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Subhash Desai Said Residents Should Take Name Shambhajinagar Aurangabad News