...तर उद्या चमच्याने पाणी प्यावे लागेल - रतनलाल कटारिया

...तर उद्या चमच्याने पाणी प्यावे लागेल - रतनलाल कटारिया

औरंगाबाद : पाणी वाचवणे ही काळची गरज आहे. ती आपण ओळखायला हवी. जसे पाणी आपली तहान भागवते, आपल्याला जगवते, तशीच आपण जमिनीची देखील पाण्याने तहान भागवायला हवी, अन्यथा उद्या आपल्याला चमच्याने पाणी प्यावे लागेल, अशी भिती केंद्रीय राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांनी येथे व्यक्‍त केली. 

बीड बायपास येथे सोमवारी (ता.13) रेन्देवो रिसॉर्ट येथे राष्ट्रीय जल मिशनव्दारा आयोजित "शेतीत पाण्याच्या वापराची क्षमता वाढवणे' या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेचे उदघाटन श्री. कटारीया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, दिवसेंदिवस पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मात्र त्या, तुलनेत पाण्याची उपलब्धता वाढलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी पर्यायी पिक पध्दती वापरणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.

सर्व सजीव सृष्टीसाठी पाणी सर्वाधिक आवश्‍यक घटक आहे. वाढती लोकसंख्येच्या वाढते औद्योगिकरण, कृषी विकास यांच्यामुळे पाण्याचा वापर वाढत आहे. पण, दिवसागणिक पाण्याच्या उपलब्धतेत घट होत आहे. पावसाचा कालावधी आणि प्रमाण असंतुलित झालेले आहे. गेल्या 60-70 वर्षात प्रती व्यक्ती पाण्याच्या उपलब्धतेच्या प्रमाणात खूप मोठी घट झालेली आहे.

भविष्यात ते प्रमाण अधिक चिंताजनक होणार आहे. त्यामुळे भारतासारख्या पूर्णपणे पर्जन्यमानावर आधारित शेती करणाऱ्या देशाने खूप काळजीपूर्वक उपलब्ध पाणीसाठा जपून आणि नियोजनबध्दपणे वापरला पाहिजे, असे सांगून श्री. कटारीया म्हणाले, चीन, ब्राझील, अमेरीका या देशातील कृषीसीठीच्या पाणी वापराच्या तुलनेत भारतात कृषीक्षेत्रासाठी पाणी खूप जास्त प्रमाणात वापरले जाते. शेती ऐवजी पिकांना पाणी देण्याची नेमकी पध्दत आपण स्विकारली पाहिजे.

पाण्याच्या उपयुक्तता वाढीसाठी जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने "सही फसल' या कार्यशाळेव्दारा शेतकऱ्यांना कमी पाण्यात पर्यायी पिक घेण्याच्या पध्दतीबाबत जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे सांगून श्री. कटारीया म्हणाले, पंजाब, दिल्लीनंतर आज औरंगाबाद येथे ही कार्यशाळा घेण्यात येत असून ज्या पिकांसाठी कमी पाणी लागते, अशा पिकांची लागवड करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या कार्यशाळेच्या माध्यमातून कृषी सिंचनाच्या बाबत अनेक उपयुक्त कल्पना पुढे येतील.

शेतकऱ्यांना पाण्याचा उपयुक्त वापर करण्याचे मार्गदर्शन देण्याच्या दृष्टीने निश्‍चितच शेतकऱ्यांना या उपक्रमांचा लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली. पाण्याचा योग्यरित्या वापर करणे ही जबाबदारी आपल्या प्रत्येकाची असून पाण्याचा व्यवस्थित वापर करुन जमीनीचा पोत, पिकांची गुणवत्ता टिकवणे शक्‍य आहे.

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून पाण्याच्या समस्येवर यशस्वी मात करुन आपण चांगल्या प्रकारे कृषी उत्पन्न घेऊ शकतो, असे सचिव यु. पी. सिंघ यांनी सांगितले. जी.अशोक कुमार यांनी कार्यशाळेच्या आयोजनाबाबतची भूमिका विषद केली. कार्यशाळेस विविध ठिकाणांहून मोठया संख्येने शेतकरी ,संबंधित उपस्थित होते. यावेळी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे ए. पी. कोहीरकर, संजय भार्गोदय, श्री. हिरे, मनीष निरंजन उपस्थित होते. 

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com