कोरोनामुळे नाट्यगृहांमधून नाही यंदा माऊलीचा गजर 

मधुकर कांबळे
Tuesday, 30 June 2020

आषाढी भक्तीसंगीत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या वातावरण निर्मितीमुळे एक अंतरीक ओढ निर्माण होते. गाण्यांच्या माध्यामातुन माऊलीची भेट झाल्याचा आनंद मिळतो.

औरंगाबाद  : आषाढी एकादशीला विठ्ठल - रखुमाईच्या मदिरांमधून भजनाचे तर शहरातील विविध नाट्यगृहातुन भक्तीसंगीताच्या माध्यमातुन विठ्ठलनामाचा गजर होत असतो. लोक भक्तीरसात न्हाऊन निघत मात्र असे दृश्‍य यंदाच्या आषाढीला पहायला मिळणार नाही. कोरोनामुळे नाट्यगृहांच्या भिंतीना भक्तीरचना ऐकायला मिळणार नाहीत. मात्र रसिकभक्तांना सोशल मिडीयावर ऑनलाईन भक्तीसंगीताचा आस्वाद घेत भक्तीभाव जागवण्याची सोय काहीजणांनी केली आहे. 

स्वरविहारच्यावतीने गेल्या २४ वर्षांपासून जगदगुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृहात ‘ गजर विठ्ठलाचा ' हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो मात्र यंदा हा महोत्सव होणार नाही. स्वरविहारचे प्रसिद्ध गायक प्रा. राजेश सरकटे म्हणाले, आषाढी भक्तीसंगीत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या वातावरण निर्मितीमुळे एक अंतरीक ओढ निर्माण होते. गाण्यांच्या माध्यामातुन माऊलीची भेट झाल्याचा आनंद मिळतो. माझे सारे कुटूंब या कार्यक्रमाच्या तयारीसाठी महिनाभर आधीच लागत असते मात्र यंदा चुकल्यासारखे वाटत आहे. कोरोना पुर्णपणे संपून पुन्हा पुढच्यावर्षी माऊलीची सेवा करता यावी हीच पांडूरंगाचरणी प्रार्थना. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तापडिया नाट्यगृहात दरवर्षी विधाते बंधू गेल्या २२ वर्षापासून अभंगवाणीचे आयोजन करतात. बजरंग विधाते म्हणाले, यावर्षी करोनामुळे अभंगवाणी यंदा सार्वजनीक स्वरूपात होणार नसली तरी ही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी सदगुरू संगीत विद्यालयातच भगवंताचे नामस्मरण करून प्रातिनिधिक स्वरूपात अभंगवाणी होईल. भविष्यातही पांडुरंग परमात्माच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो कि करोना व्हायरस दुर होऊन या सर्वांना उपासना करण्याचे सदभाग्य लाभो हीच परमात्मा पांडुरंगा चरणी प्रार्थना. 

स्वरराजतर्फे दरवर्षी आमच्या परिवाराच्यावतीने जय हरी विठ्ठल नावाने आषाढी महोत्सव आयोजित करत आहोत. मात्र यंदा त्यात खंड पडणार आहे. स्वरराजचा आषाढी महोत्सव एमजीएम स्टेडीयममध्ये सार्वजनीक स्वरूपात होत असतो. यावर्षी कोरोनामुळे ऑनलाईन भक्ती सेवेचे नियोजन हा पर्याय आहे. यावर्षी मला व स्वराजला लंडन वारकरी ट्रस्टचे ऑनलाईन गायनासाठी निमंत्रण आहे. मी संगीत बध्द केलेल्या "विठ्ठल परब्रह्म सावळे"अल्बम मधील काही भक्ती गीते या कार्यक्रमात सादर होणार आहेत. विठूमाऊलीच्या कृपेने निश्चित हे कोरोना संकट लवकरच दूर होईल. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सखा पांडूरंगचे फेसबुक लाईव्ह 

आषाढीनिमित्त शिवाजीनगर येथे ‘ सखा पांडूरंग ' या भक्तीसंगीताच्या कार्यक्रमाचे सादरीकरण करणारे प्रा. डॉ. तुकाराम वांढरे म्हणाले, गेल्या ११ वर्षांपासून भक्तीसंगीताच्या माध्यमातुन विठू माऊलीची सेवा करत आहे. मात्र यावर्षी कोरोनामुळे सार्वजनीक स्वरुपात कार्यक्रम करता येणार नाही याची खंत जरूर वाटते मात्र त्यापेक्षा लोकांनी घरातच राहून स्वत:ची आणि कुटूंबियांची सुरक्षितता जपत भक्तीसंगीताचा अस्वाद घ्यावा यासाठी तुकाराम वांढरे नावाच्या फेसबुक अकौंटवर बुधवारी (ता.एक) सायंकाळी ७ वाजता फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात भक्तीगीते सादर करणार आहे. सोबत माझी मधुरा आणि वेणू या सहा आणि दहा वर्षाच्या मुली करोओके ट्रॅकवर भक्तीगीते सादर करणार असल्याचे प्रा. वांढरे यांनी सांगीतले. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

ऑनलाईन 'देव माझा विठू सावळा' कार्यक्रम 

शिवसेनाच्यावतीने या आषाढी एकादशीच्या निमित्ताने 'देव माझा विठू सावळा' हा भक्तीगीतांचा कार्यक्रम यंदा पहिल्यांदाच ऑनलाइन आयोजित केले आहे. बुधवारी (ता. एक ) सायंकाळी ७.३० वाजता होणार आहे. आषाढी एकादशी निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवर http://www.facebook.com/iambadasdanve युट्यूबवर https://www.youtube.com/channel/UC८sBZh५CyQXGGtoR४tDO०WQ व इंस्टाग्राम https://instagram.com/iambadasdanve?igshid=lnwcg४०५५ucj यावर लाईव्ह विठ्ठलाची भक्तिगीते पाहता येईल तसेच फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबवर ऑनलाइन लाइव्ह प्रेक्षक घरबसल्या सहकुटुंब विठ्ठल भक्तीने ओथंबून जाणाऱ्या भक्तीगीतांची अनुभूती घेऊ शकतात. पंढरपूरला दरवर्षी लोटणारा भक्तीचा महासागर अनुभवता येणार नसल्यामुळे जास्तीत जास्त भाविकांनी व वारकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is No Ashadhi Devotional Song Programme In Theaters Due To Corona Aurangabad News